धाराशिव | 'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा
बदलत्या हवामानात आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे खालावत चाललेले मातीचे आरोग्य वाचवण्यासाठी आता तरुण पिढी पुढे आली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (परभणी) अंतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालय, धाराशिव येथील कृषि कन्यांनी (कृषि विद्यार्थिनी) ग्रामीण कृषी कार्यनुभव व औद्योगिक संलग्नीकरण (RAWE) योजनेअंतर्गत शिंगोली येथे 'खेत बचाओ अभियान २०२६' चे यशस्वी आयोजन केले होते. मंगळवार, दिनांक २३ जून २०२६ रोजी ग्रामपंचायत जवळील विठ्ठल मंदिर परिसर येथे हा प्रभावी जनजागृती उपक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. पेरके हे होते. तर कार्यक्रम समन्वयक डॉ. के. एस. थोरात, कार्यक्रम अधिकारी (रा.से.यो.) डॉ. आर. ए. पाटील, तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. एल. एस. देशमुख आणि डॉ. ए. व्ही. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम अत्यंत नेटकेपणाने राबवण्यात आला.
कृषि कन्यांनी सांभाळली धुरा
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत कृषि कन्या पर्णवी भोसे, संध्या राऊत, तनुजा ढवळे, साक्षी सुर्वे, सृष्टी हाजगुडे, श्रेया ननवरे, सिद्धी चिखले, सुप्रिया कापिरे, आकांक्षा नाईकवाडी आणि स्वरांजली माळी यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय कर्बाचे महत्त्व आणि माती वाचवण्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने आणि प्रभावीपणे जनजागृती केली.
ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
कृषि कन्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी शिंगोली गावच्या सरपंच योगिता शिंदे, उपसरपंच मनोज मगर, कृषि सहाय्यक अभिजित पाटील आणि शेतकरी प्रतिनिधी हर्षवर्धन शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या जनजागृती मोहिमेत सहभागी झाले होते. कृषि कन्यांनी राबवलेल्या या विशेष मोहिमेचे आणि त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सध्या संपूर्ण गावातून कौतुक होत आहे.
0 Comments