तुळजापूर | Only न्यूज धाराशिव वृत्तसेवा
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज (शेगाव) यांच्या पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थान केलेल्या पालखी सोहळ्याचे आज श्रीक्षेत्र तुळजापूर नगरीत अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात आगमन झाले. यावेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी सपत्नीक पालखीचे स्वागत करत दर्शन घेतले. त्यांनी पालखीला पुष्पहार अर्पण करून आणि श्रीफळ देऊन माऊलींचे स्वागत केले.
वारकरी आणि सेवेकऱ्यांचा सन्मान
पालखी सोहळ्यासोबत आलेल्या हजारो वारकरी, दिंडीप्रमुख आणि सेवेकऱ्यांचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भावपूर्ण स्वागत करण्यात आले. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही मंदिर संस्थानच्या वतीने पालखीतील वारकरी आणि सेवेकऱ्यांसाठी शिधा (अन्नधान्य) व्यवस्था करण्यात आली होती. पालखीचे आगमन होताच संपूर्ण तुळजापूर परिसर "गण गण गणात बोते" आणि हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. माऊलींच्या दर्शनासाठी स्थानिक भाविकांनी आणि तुळजापुरात आलेल्या यात्रेकरूंनी मोठी गर्दी केली होती.
सुख-समृद्धीसाठी प्रार्थना
याप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेऊन राज्यातील जनतेला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थना केली. पालखी सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडण्यासाठी मंदिर संस्थानच्या वतीने चोख सुरक्षा व्यवस्था आणि भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या सोहळ्याप्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे यांनीही सपत्नीक उपस्थित राहून दर्शन घेतले. तसेच मंदिर तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्रीमती माया माने, मंदिर संस्थानचे विविध अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधव, वारकरी आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुळजापुरात आज भक्ती आणि शक्तीचा एक अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला.
0 Comments