'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
आजच्या आधुनिक आणि चकाचक दुनियेत वाढदिवसाचे सेलिब्रेशन केक कापून किंवा पार्ट्या देऊन साजरे करण्याची फॅशन रूढ होत असताना, तुळजापूर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेने मात्र समाजासमोर एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. केंद्र नांदुरी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कदमवाडी (मा) येथे विद्यार्थ्यांचा वाढदिवस आता केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न राहता, तो थेट निसर्गाशी जोडला जाणार आहे. शाळेने 'वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण' हा अभिनव नवोपक्रम हाती घेतला असून, यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाढदिवसाला एका झाडाचे रोपण केले जाणार आहे.
दीर्घायुषी आणि फलदायी वृक्षांना प्राधान्य
केवळ औपचारिकता म्हणून झाडे लावून ती सोडून न देता, ती वर्षानुवर्षे टिकावीत आणि येणाऱ्या पिढ्यांना त्याचा लाभ व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी शाळेने वड, चिंच, पिंपळ, आंबा, चिकू, पेरू, कडुलिंब आणि रामफळ यांसारख्या दीर्घायुषी व फळे देणाऱ्या वृक्षांची निवड केली आहे. या झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल तर राखला जाईलच, सोबतीला पक्षांना हक्काचा आसरा आणि मानवाला सावली व फळे मिळतील, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
चिमुकल्या भक्तीच्या हाताने उपक्रमाचा श्रीगणेशा
या आगळ्यावेगळ्या आणि कौतुकास्पद उपक्रमाची सुरुवात आज अत्यंत उत्साहात करण्यात आली. शाळेतील इयत्ता पहिलीत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी भक्ती प्रशांत मिसाळ हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला. भक्तीने आपल्या वाढदिवसानिमित्त स्वतःच्या हाताने पहिले रोपटे लावून या अभियानाचा पाया रचला. तिच्या या कृतीचे आणि तिच्या पालकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
"केवळ केक कापून आनंद साजरा करण्यापेक्षा, आपल्या मुलाच्या नावाने निसर्गात एक नवीन आयुष्य जन्माला घालणे हा संस्कार बालमनावर होणे गरजेचे आहे. कदमवाडी शाळेचा हा उपक्रम कौतुकास्पद असून इतर शाळांसाठीही मार्गदर्शक ठरेल."
— शाळा व्यवस्थापन समिती
पालकांचा उदंड प्रतिसाद आणि शिक्षकांचा पुढाकार
ग्रामीण भागातील पालकांनी या उपक्रमाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, भक्तीचे वडील श्री. प्रशांत मिसाळ यांनी शाळेच्या या हाकेला ओ दिली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. घोडके, सहशिक्षक श्री. डी. टी. (सर) आणि शिक्षिका श्रीमती भुतेकर एस. आर. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. सर्वांनी कुमारी भक्ती हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, तिच्या पालकांचे विशेष आभार मानले.
शाळेच्या या उपक्रमामुळे कदमवाडी परिसराचे रूप येत्या काळात नक्कीच हिरवेगार होईल, यात शंका नाही. जिल्हा परिषद शाळेने राबवलेला हा 'ग्रीन पॅटर्न' सध्या संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.
0 Comments