Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीच्या शिक्षित कुंभार बंधूंची कमाल; काटीतील 'बोलक्या' गौरी मुखवट्यांना अमेरिका, कॅनडातून मोठी मागणी

काटी येथील 'श्री आर्ट्स' कार्यशाळेला भेट देऊन फायबर बॉडीसह लक्ष्मी मुखवट्यांची पाहणी करताना तुळजापूरचे सेवानिवृत्त शिक्षक सतीश खोपडे व त्यांच्या धर्मपत्नी.

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
गणेशोत्सवाच्या पाठोपाठ घरोघरी विराजमान होणाऱ्या लाडक्या महालक्ष्मी अर्थात गौरीच्या आगमनाची उत्सुकता सर्वत्र दिसून येत आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शिक्षित कुंभार बंधूंनी आपल्या पारंपरिक कलेला modern touch देत तयार केलेल्या गौरी मुखवट्यांनी थेट सातासमुद्रापार झेप घेतली आहे. 'श्री आर्ट्स'च्या माध्यमातून साकारलेल्या या अत्यंत सुबक, देखण्या आणि जिवंत वाटणाऱ्या गौरी मुखवट्यांना महाराष्ट्रासह देशातील ७ राज्यांत आणि अमेरिका, कॅनडा, कुवेत यांसारख्या परदेशांतील बाजारपेठेत मोठी मागणी मिळत आहे.

महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या वारकरी, भजनी मंडळ व विविध लोककला सेट्सचे आकर्षक प्रदर्शन.

पारंपरिक कलेला शिक्षणाची जोड
काटी येथील श्रीकांत बबन कुंभार (पदवीधर) आणि त्यांचे धाकटे बंधू मंगेश बबन कुंभार (बी.ई. सिव्हिल इंजिनिअर) यांनी पारंपरिक कुंभारकामाच्या चौकटीबाहेर जात या कलेत अमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यांचे आजोबा कै. भानुदास कुंभार यांच्यापासून चालत आलेल्या या ४० वर्षांच्या परंपरेला आधुनिक तंत्रज्ञान आणि अभ्यासाची जोड दिली. या कामात त्यांना मावस भाऊ विकास कुंभार आणि संपूर्ण कुटुंबाची भक्कम साथ लाभली आहे.


मुखवट्यांची वैशिष्ट्ये आणि आधुनिक सुधारणा
पूर्वी पारंपरिक मातीच्या मुखवट्यांना एकाच साचेबद्ध पद्धतीने रंगवले जायचे. परंतु, या बंधूंनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा (POP) वापर करून ५ ते १० इंचांपर्यंतचे आकर्षक मुखवटे तयार केले आहेत.

सजीव डोळे आणि सुबक आखणी: हुबेहुब आणि सजीव वाटणारे डोळे, धारदार नाक, नाजूक जिवणी आणि आकर्षक भुवया हे या मुखवट्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

दागदागिन्यांची सोय: गौरी आणि देवीच्या मुखवट्यांना भाविकांच्या आवडीनुसार नथ, झुबे व कर्णफुले सहजरीत्या घालता यावीत, अशी विशेष रचना करण्यात आली आहे.

फायबर बॉडी आणि व्हरायटी: आधुनिक गरजेनुसार फायबर बॉडीसह लक्ष्मी मुखवटे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

देश-विदेशातून २ हजारांहून अधिक मुखवटे रवाना
काटीतील या कार्यशाळेतून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सोलापूर, लातूर, धाराशिव, पंढरपूर या शहरांसह दक्षिण भारतातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये आतापर्यंत २००० हून अधिक गौरी मुखवटे विक्रीसाठी पाठवण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे अमेरिका, कॅनडा, युरोप, जर्मनी, डेन्मार्क आणि दुबई येथे स्थायिक असलेल्या भारतीय भाविकांकडून कुरिअरद्वारे १०० हून अधिक मुखवट्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. अमेरिका आणि कुवेत येथील दुकानांमध्ये हे मुखवटे विक्रीस उपलब्ध झाले असून, तिथल्या भाविकांकडून अत्यंत कौतुकास्पद आणि समाधानी प्रतिक्रिया येत आहेत.

संस्कृती अन् परंपरेचे दर्शन घडवणारे विविध 'थीम सेट्स'
श्री आर्ट्समध्ये केवळ गौरी मुखवटेच नव्हे, तर महाराष्ट्राची लोककला, संस्कृती आणि समृद्ध परंपरेचे दर्शन घडवणारे विविध आकर्षक मूर्ती सेट्स तयार केले जात आहेत.

सजीव डोळे, धारदार नाक आणि उत्कृष्ट फिनिशिंगने नटलेले 'श्री आर्ट्स'चे आकर्षण ठरत असलेले गौरी लक्ष्मीचे मुखवटे.

लोककला व परंपरा सेट: वारकरी सेट (कलर व ८ मूर्ती सेट), संपूर्ण पालखी सोहळा सेट, गोंधळी पूजा सेट, वासुदेव, मावळा सेट.

सामाजिक जीवन सेट: बारा बलुतेदार सेट, भजनी मंडळ सेट, आणि पारंपरिक कामे करणाऱ्या ग्रामीण महिलांचे सेट्स.

सुबक गौरी मुखवट्यांची पारख: काटी येथील 'श्री आर्ट्स'मध्ये गौरी मुखवटे आणि विविध कलाकृतींची कौतुकाने पाहणी करताना सतीश खोपडे व कुटुंबीय.

या कलाकृती पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी तुळजापूर व आसपासच्या परिसरातून भाविक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. नुकतीच तुळजापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक सतीश खोपडे व त्यांच्या कुटुंबीयांनी कार्यशाळेला भेट देऊन फायबर बॉडीसह लक्ष्मी मुखवटे खरेदी केले आणि कुंभार बंधूंच्या या कौशल्याचे विशेष कौतुक केले.

Post a Comment

0 Comments