Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडीत ‘जलजीवन’च्या भोंगळ कारभारामुळे दलित वस्तीत घाणीचे साम्राज्य; ठेकेदाराच्या मनमानीविरोधात माजी सैनिक सावंत आक्रमक

काटी | ​'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
 तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथे ‘जलजीवन मिशन’च्या कामातील ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दलित व मातंग वस्तीत अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पाईपलाईन टाकताना भूमिगत गटारी आणि पाणीपुरवठ्याच्या वाहिन्या फोडल्याने रस्त्यावर सांडपाणी साचले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी दोषी ठेकेदारावर कारवाई करून स्मशानभूमी व कब्रस्तानच्या सुशोभीकरणासाठी माजी सैनिक शिवाजी सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध यंत्रणांकडे आक्रमक पाऊल उचलत संयुक्त निवेदन दिले आहे.  

​काय आहे नेमका प्रकार?
तामलवाडी येथे जलजीवन मिशनअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट व निष्काळजीपणे काम करत गाрमधील संपूर्ण भूमिगत गटारी (Underground Drainage) आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन फोडून टाकल्या आहेत. रस्ते उकरून तसेच ठेवल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरले असून दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः, याच भागातून हिंदू व दलित स्मशानभूमीकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने नागरिकांची तीव्र गैरसोय होत आहे.  
​
रोगराईची दाट शक्यता
रस्त्यावर साचलेले सांडपाणी आणि वाढलेली दुर्गंधी यामुळे लहान मुले, महिला व वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात डेंग्यू, मलेरिया आणि कॉलरासारख्या गंभीर संसर्गजन्य आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.  

​माजी सैनिकांची आक्रमक भूमिका
या गंभीर समस्येची दखल घेत आशा बहुउदद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सैनिक श्री. शिवाजी रामकृष्ण सावंत यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक, धाराशिवचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच तुळजापूरचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना ई-मेलद्वारे संयुक्त निवेदन पाठवले आहे.  
​
निवेदनातील प्रमुख मागण्या:
१. ठेकेदारावर कारवाई: झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी आणि त्याच्या अनामत रकमेतून रस्ते व गटारी पूर्ववत करून द्याव्यात.
२. स्मशानभूमी व कब्रस्तानचा विकास: १५ वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना, अल्पसंख्याक विकास निधी तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून हिंदू, दलित स्मशानभूमी आणि मुस्लिम कब्रस्तानचा संयुक्त विकास करावा.
३. सवलती व सुविधा: स्मशानभूमीसाठी संरक्षण भिंत, पेव्हर ब्लॉक, सौर दिवे, दशक्रिया शेड, वजू व जनाजा शेड तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामफलक यांसारख्या सर्वसमावेशक सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात. 

​याप्रकरणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतः ‘स्पॉट व्हिजिट’ (थेट पाहणी) करून तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

.       -- माजी सैनिक शिवाजी सावंत, तामलवाडी 

​"जलजीवन मिशन ही ग्रामीण भागात शुद्ध पाणी पोहोचवणारी अतिशय चांगली योजना आहे; परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तामलवाडीतील दलित व मातंग वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा थेट मानवी प्रतिष्ठेचा व आरोग्याचा प्रश्न आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया माजी सैनिक श्री. शिवाजी सावंत यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments