'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
“राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आधीच हवालदिल झाले असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. मात्र, या बिकट परिस्थितीतही मायक्रो फायनान्स कंपन्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरावर जाऊन जप्ती आणण्याचा किंवा त्यांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरून संघर्ष करू,” असा सज्जड व आक्रमक इशारा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.
तुळजापूर तालुक्यातील मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या तामलवाडी येथील सरस्वती मंगल कार्यालयात सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) सायंकाळी आयोजित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या दिवाळी शिधा (आनंदाचा शिधा) वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
'दुष्काळग्रस्तांसाठी दिवाळीचा शिधा' आणि 'मदतीचं तोरण, हेच शिवसेनेचं धोरण' या मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात शासनाचा कोणताही निधी न वापरता, पालकमंत्र्यांच्या स्वखर्चातून रवा, मैदा, तेल, साखर, पणत्या आणि उटणं अशा जीवनोपयोगी नऊ वस्तूंच्या किटचे हजारो दुष्काळग्रस्त कुटुंबांना वाटप करण्यात आले.
प्रशासन आणि नेत्यांची उच्चस्तरीय उपस्थिती
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती प्रियंवदा महाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जयप्रकाश राजेनिंबाळकर,शिवसेना नेते देवानंद (भाऊ) रोचकरी हे प्रमुख मान्यवर म्हणून आवर्जून उपस्थित होते.
केंद्राच्या मदतीसाठी जोरदार पाठपुरावा
यावेळी संवाद साधताना पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, सध्या राज्यातील ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले असून, त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील ८ तालुक्यांचा समावेश आहे. पाण्याचे दुर्भिक्ष आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तसेच, राज्य शासनाच्या माध्यमातून अवघ्या दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदतीचे पैस जमा होण्यास सुरुवात होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री सरनाईक यांनी दोन महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले.
१. महायुतीत वाद नाही -
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महायुतीत बेबनाव दिसला, पराभूत उमेदवार सतीश चव्हाण यांनी भाष्य केले, शिवसेना-राष्ट्रवादीत वाद पेटला या प्रश्नावर सरनाईक म्हणाले, "एखादी व्यक्ती काय बोलते हा त्या पक्षाची भूमिका असू शकत नाही. महायुतीमध्ये कोणताही बेबनाव नाही. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे."
२. पोलीस व्हेरिफिकेशनशिवाय गाड्यांवर कारवाई
वाहतूक व्यवस्थेबाबत बोलताना ते म्हणाले, "ज्या काही संस्था आहेत, त्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. या संदर्भात गेल्या आठवड्यात मी परिवहन आयुक्तांना सूचना केली आहे. पोलीस व्हेरिफिकेशन शिवाय जर कोणी गाड्या रस्त्यावर आणत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल."
फायनान्स कंपन्यांना घरचा अहेर
सध्याच्या आर्थिक संकटाचा फायदा घेऊन काही मायक्रो फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सक्तीची वसुली व जप्तीचा बडगा उगारत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यावर अत्यंत कडक भूमिका घेत सरनाईक म्हणाले, “माझ्या जिल्ह्यामध्ये जर कोणत्याही मायक्रो फायनान्स कंपनीने जाणीवपूर्वक शेतकऱ्याला वेठीस धरले किंवा दारात जाऊन त्रास दिला, तर मला देखील त्यांच्या दारावर जावे लागेल. हे असले प्रकार मी अजिबात खपवून घेणार नाही.”
शिवसेना ही नेहमीच मदतीची सेना
“शिवसेना पक्षाचा जन्मच सर्वसामान्य गोरगरीब जनता आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेत आहेत. आमच्या रक्तामध्येच संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याची शिकवण आहे,” असे सांगत सत्तेत असो वा नसो, शिवसेना नेहमीच लोकांच्या दारापर्यंत पोहोचत आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यास शिवसेना युवा नेते ऋषी भैय्या मगर,मोहन पनुरे, संतराम वानखेडे,अमरराजे कदम,अमोल जाधव ,गणेश जगताप, युवासेना प्रमुख तुळजापूर विधानसभा गणेश (दादा) रोचकरी, महेश केदार, श्री आकाश भैय्या कोकाटे, प्रतिक रोचकरी,सुजित (भैय्या) हंगरगेकर (काटी सरपंच),विकास जाधव गौरीशंकर कोडगिरे, अमर माने (उपसरपंच वाडी बामणी)बसवनप्पा मसुते, अप्पू राजे गवळी, बालाजी चुंगे, विजय जाधव आदी मान्यवरांसह तामलवाडी, पिंपळा, काटी, सावरगाव, सुरतगाव आदी परिसरातील हजारो ग्रामस्थ, महिला तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments