यशस्वी सुपुत्रांचा गौरव: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) बालरोग तज्ज्ञ (वर्ग 'अ') पदी राज्यात प्रथम क्रमांक मिळवून निवड झाल्याबद्दल डॉ. दिग्गज दापके-देशमुख यांचा तसेच राज्य शासनाच्या 'ज्ञान भारतम' समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. अभिमान हंगरगेकर यांचा रुक्मिणी फाऊंडेशन व तुळजाभवानी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना मान्यवर.
धाराशिव | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
वैद्यकीय क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट सेवेचा ठसा उमटवणारे शहरातील नामांकित 'सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल'चे सर्वेसर्वा व प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. दिग्गज रमेश दापके-देशमुख यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. त्यांची बालरोग तज्ज्ञ (वर्ग 'अ') पदी निवड झाली असून, या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या वैभवात मोलाची भर पडली आहे.
या घवघवीत यशाबद्दल रुक्मिणी फाऊंडेशन व तुळजाभवानी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रविवार (दि. ३०) रोजी एका विशेष कार्यक्रमात डॉ. दिग्गज दापके-देशमुख यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित नागरी सत्कार करण्यात आला.
प्रा. अभिमान हंगरगेकर यांचा दुहेरी आनंदात गौरव
याच कार्यक्रमात दै. 'एकमत'चे प्रतिनिधी तथा रुक्मिणी फाऊंडेशनचे सचिव प्रा. अभिमान हंगरगेकर यांची राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'ज्ञान भारतम' जिल्हा शासकीय समितीवर नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. एकाच व्यासपीठावर दोन गुणवंत व्यक्तिमत्त्वांचा सत्कार झाल्याने उपस्थितांनी या दुहेरी यशाचे कौतुक केले.
वैद्यकीय सेवेचा व ज्ञानाचा समाजाला मोठा फायदा : मान्यवर
सत्कार प्रसंगी बोलताना उपस्थितांनी सांगितले की, डॉ. दिग्गज दापके-देशमुख यांनी आजवर वैद्यकीय क्षेत्रात अतिशय निष्ठेने आणि तळमळीने बालरुग्णांची सेवा केली आहे. स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम येऊन त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीचा आणि कौशल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे शासकीय सेवेत बालआरोग्य यंत्रणेला मोठा बळकट आधार मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. तसेच प्रा. हंगरगेकर यांच्या निवडीमुळे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात नवीन दिशा मिळेल, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या सोहळ्यास प्रा. पी. एन. दापके, प्राचार्य जी. के. सोन्नेपाटील, दिनकर हुग्गे, प्रा. डॉ. तुकाराम बारबोले, माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव जाधव, गोरोबा लोंढे, अशोक चव्हाण, दिलीप पवार, दादासाहेब हंगरगेकर, सतीश पवार, डॉ. महेश हंगरगेकर यांच्यासह वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन्ही सत्कारांनंतर डॉ. दिग्गज दापके-देशमुख व प्रा. अभिमान हंगरगेकर यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Comments