Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

केमवाडीत उसावर ‘पायारीला’ किडीचा प्रादुर्भाव; तुळजापूर तालुक्यातील केमवाडी शेतकरी चिंतेतसुमारे ४४.५ एकरावरील पीक संकटात; कृषी विभागाकडून तातडीने मार्गदर्शन व मदतीची शेतकऱ्यांची मागणी


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
हवामानातील बदल आणि सततच्या अनुकूल वातावरणामुळे तुळजापूर तालुक्यातील केमवाडी परिसर व आसपासच्या भागात उसावर ‘पायारीला’ (Pyrilla / पाकोळी) या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जानेवारी २०२६ मध्ये लागवड केलेल्या उसाच्या पिकावर या किडीने अचानक आक्रमण केल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होत असून, उसाची पाने पिवळी पडून वाळू लागली आहेत. परिणामी, परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

४४.५ एकरावरील ऊस संकटात
केमवाडी येथील अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या आशेने जानेवारी महिन्यात उसाची लागवड केली होती. मात्र, पीक बाळसे धरत असतानाच पायारीला किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये येथील प्रमुख शेतकऱ्यांच्या क्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने बालाजी सुनील काळे – १२ एकर,रामचंद्र अरुण इटूकडे – १० एकर, नंदकुमार मेहता – ६ एकर, हरिदास शहाजी काळे – ५ एकर,धनंजय फंड – ४ एकर,कल्याण नकाते – ३ एकर, बापू पारडे – ३ एकर,प्रकाश रामचंद्र काळे – २ एकर, बापूसाहेब गायकवाड – १.५ एकर असे एकूण सुमारे ४४.५ एकर क्षेत्रावरील उसाला या किडीने ग्रासले आहे.

काय आहे नुकसानीचे स्वरूप आणि लक्षणे
तज्ज्ञांच्या मते, पायारीला किडीची पिल्ले (Nymphs) आणि प्रौढ किडे उसाच्या पानांच्या खालच्या बाजूने रस शोषून घेतात. रस शोषल्यामुळे पानांवर पिवळे व पांढरट ठिपके पडतात आणि शेवटी पाने कोमेजून वाळतात. तसेच ही कीड पानांवर चिकट, पारदर्शक द्रव सोडते. त्यावर काळी बुरशी वाढल्यामुळे पानांची प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) क्रिया मंदावते, ज्यामुळे उसाची वाढ खुंटते. या किडीमुळे उत्पादनात २८ ते ५० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते, तर साखरेच्या उताऱ्यातही २ ते ३ टक्क्यांनी घट होण्याचा धोका असतो.

हवामानातील बदल ठरतोय पोषक
पावसातील प्रदीर्घ खंड, त्यानंतर रात्रीचे सौम्य तापमान आणि दिवसा समशीतोष्ण हवामान यांसारख्या बदलांमुळे पायारीला किडीचा जीवनक्रम जलद गतीने पूर्ण होत आहे. आद्रतेचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा जास्त आणि तापमान २४ ते ३४ अंश सेल्सिअसदरम्यान राहिल्यास या किडीची संख्या प्रचंड वेगाने वाढते.

शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तातडीचे उपाय व एकात्मिक नियंत्रण
१. शेत पाहणी व स्वच्छता: शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून किडीची प्राथमिक अवस्था ओळखावी. उसावरील जुनी, वाळलेली पाने काढून टाकावीत (पाचट काढणे), जेणेकरून हवा खेळती राहील.उसाच्या पानांच्या खालच्या बाजूला किडींच्या अंड्यांचे समूह आढळल्यास ते गोळा करून नष्ट करावेत.

२. जैविक नियंत्रण (मित्र कीटकांचे संरक्षण):
निसर्गात पायारीला किडीच्या अंड्यांवर व पिल्लांवर जगणारे ‘एपिरिकॅनिया मेलॅनोलेउका’ आणि ‘टेट्रास्टीचस पायारीली’ हे मित्र कीटक आढळतात. रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर टाळून या मित्र कीटकांचे संरक्षण करावे. प्रादुर्भावाच्या सुरुवातीस ॲझाडिरॅक्टिन (१५०० पीपीएम) ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

३. रासायनिक नियंत्रण (प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर असल्यास):
प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोरपायरीफॉस (२०% ई.सी.) ३० मिली किंवा ॲसफेट (७५% एस.पी.) ४५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार).

शेतकऱ्यांची मागणी
"आम्ही जानेवारीत मोठ्या कष्टाने उसाची लागवड केली होती. मात्र, सध्या पायारीला किडीचा प्रादुर्भाव एवढा वाढला आहे की हाताशी आलेले पीक वाया जाण्याची भीती आहे. कृषी विभागाने तातडीने केमवाडी परिसराची पाहणी करून शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन व आवश्यक कीटकनाशकांचा पुरवठा करावा."

— बालाजी सुनिल काळे, केमवाडी, बाधित शेतकरी 

"केमवाडी परिसरात सुमारे ४४ एकरांपेक्षा जास्त उसाला या किडीने ग्रासले आहे. औषध फवारणी करूनही किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कृषी विभागाने तातडीने या भागाची पाहणी करून आम्हाला मोफत औषधे आणि योग्य मार्गदर्शन पुरवावे."
— रामचंद्र अरुण इटूकडे (बाधित शेतकरी, केमवाडी)

"जानेवारी महिन्यात मोठ्या आशेने १२ एकर उसाची लागवड केली होती. पीक चांगलं बाळसे धरत असतानाच या 'पायारीला' किडीने अचानक हल्ला केलाय. किडीमुळे उसाची पाने पिवळी पडू लागली असून हाताशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने आमची दखल घ्यावी."
— हरिदास शहाजी काळे (बाधित शेतकरी, केमवाडी)

Post a Comment

0 Comments