मंगरुळ (ता. तुळजापूर): ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना मान्यवर, उपस्थित रक्तदाते आणि मुस्लिम बांधव.
'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा
मंगरुळ | प्रतिनिधी
इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे (ईद-ए-मिलादुन्नबी) औचित्य साधून तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ६३ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. विशेष म्हणजे, या उपक्रमात महिलांचा आणि सर्वधर्मीय युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' या भावनेतून आयोजित या शिबिराला गाव व परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला. धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत मंगरुळ येथील मुस्लिम बांधवांनी सर्वधर्मसमभाव आणि मानवतेचा संदेश दिला.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद डोंगरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती चित्तरंजन सरडे, बीट अंमलदार वाघुलकर, महेश डोंगरे, शिवसेनेचे विरेश डोंगरे, आप्पासाहेब जेटिथोर, विजय डोंगरे, अनंत उपासे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जब्बार शेख यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार पत्रकार चांदसाहेब शेख यांनी मानले. रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्तार मुलानी, आदमशा फकीर, ॲड. सद्दाम शेख, सोहेल बागवान, ॲड. जमीर शेख, नशीब शेख यांच्यासह मुस्लिम बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी मंगरुळ ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौरव: मंगरुळ येथील शिबिरात रक्तदान करणाऱ्या बहाद्दर रक्तदात्याला प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करताना मान्यवर.
सामाजिक सलोख्याचा आदर्श!
मंगरुळ येथील मुस्लिम युवक दरवर्षी शिवजयंतीनिमित्त मसाला दूध वाटप, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सरबत वाटप आणि रमजान ईदला संपूर्ण ग्रामस्थांसाठी शिरखुरमा व स्नेहभोजनाचे आयोजन करतात. या उपक्रमांमुळे गावात बंधुभाव आणि सर्वधर्मसमभाव अधिक दृढ होत असून, अशा उपक्रमांची परंपरा कायम राहावी, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
0 Comments