'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
धार्मिक उत्सवांना सामाजिक बांधिलकीची जोड देत तुळजापूर शहरातील नळदुर्ग रस्त्यावरील पुजारी नगर येथे 'पुजारी नगरचा राजा' गणेशोत्सव मंडळाच्या वतीने व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी मुरुम टाकून रस्ते पूर्ववत करण्यात आले. त्याचबरोबर नगरपरिषदेच्या विशेष सहकार्याने संपूर्ण कॉलनीत जंतूनाशक फवारणी करण्यात आली असून, या स्तुत्य उपक्रमाचे तुळजापूर शहरातून कौतुक होत आहे.
सध्या पावसाळ्यामुळे परिसरात ठिकठिकाणी गवत वाढले असून रस्त्यांमधील खड्ड्यात पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. यामुळे डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला होता. ही बाब गांभीर्याने घेऊन 'पुजारी नगर फाऊंडेशन'चे संस्थापक अध्यक्ष गणेश पुजारी यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २२) स्वच्छता मोहीम हाती घेतली. याअंतर्गत कॉलनीतील खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून ते व्यवस्थित बुजवण्यात आले.
तुळजापूर शहरातील पुजारी नगरमध्ये नगरपरिषदेच्या फॉगिंग मशिनद्वारे जंतू व डास नियंत्रणासाठी धूर फवारणी करताना नगरसेवक आणि पुजारी नगर फाऊंडेशनचे पदाधिकारी.
फॉगिंग मशिनद्वारे जंतू व विषाणूंचा नायनाट
कॉलनीतील आरोग्य सुरक्षिततेसाठी नगरपरिषदेचे कार्यतत्पर नगरसेवक रामचंद्र (आबा) रोचकरी व विशाल (भैय्या) रोचकरी यांच्या विशेष सहकार्यातून संपूर्ण पुजारी नगर कॉलनीत फॉगिंग मशिन व जंतूनाशक यंत्राद्वारे फवारणी करण्यात आली. या आधुनिक यंत्राद्वारे जंतूनाशकाचे अत्यंत बारीक तुषार (धूर) हवेत पसरवून परिसर निर्जंतुक करण्यात आला. या धुरामुळे लपलेल्या डासांचा, जिवाणू आणि विषाणूंचा नायनाट होण्यास मदत होणार असून डासांच्या प्रादुर्भावाला वेसण बसणार आहे.
पावसाळ्यातील साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी पुजारी नगर कॉलनीत फॉगिंग यंत्राद्वारे संपूर्ण परिसरात करण्यात आलेली धूर फवारणी.
२४ सप्टेंबरला भव्य रक्तदान व अन्नदान
मागील तीन-चार वर्षांपासून 'पुजारी नगरचा राजा' गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सातत्याने समाजोपयोगी, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम राबवले जातात. याच परंपरेचा भाग म्हणून येत्या गुरुवारी (दि. २४) मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर व महाप्रसादाचे (अन्नदान) आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज सकाळ-संध्याकाळ विविध मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती करून त्यांचा यथोचित सन्मान केला जात आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रुतेश कवडे, उपाध्यक्ष राहुल जाधव, खजिनदार मल्लेश विभुते, सह-खजिनदार पाटील, सचिव महेश पुजारी, फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष श्रावण (मामा) पुजारी, ज्येष्ठ सदस्य विश्वनाथ पुजारी, सतीश खोपडे व स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पुजारी नगरचा राजा' गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कॉलनीतील खड्डे बुजवण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने मुरुम टाकून स्वच्छता मोहीम राबवताना.
विद्यमान नगरसेवक व अध्यक्षांचे मनोगत
"नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही आमची प्राथमिक जबाबदारी"
"पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याचा धोका जास्त असतो. पुजारी नगरमधील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि परिसर डासमुक्त व्हावा, यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून फॉगिंग मशिनद्वारे फवारणी उपलब्ध करून दिली आहे. प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
— रामचंद्र (आबा) रोचकरी (नगरसेवक, तुळजापूर)
"तंत्रज्ञानाच्या मदतीने जंतू व डासांचा प्रभावी नायनाट"
"फॉगिंग मशिनच्या धुराद्वारे जंतूनाशकाचे सूक्ष्म तुषार हवेत पसरून सर्व कोनाकोपऱ्यांतील डास व विषाणू नष्ट होतात. गणेशोत्सव काळात कॉलनीत स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण राहावे, यासाठी पुजारी नगर मंडळाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून, नगरपरिषदेचे सहकार्य नेहमीच राहील."
— विशाल (भैय्या) रोचकरी (नगरसेवक, तुळजापूर)
"सामाजिक भान जपत गणेशोत्सव साजरा करण्याचा आमचा संकल्प"
"उत्सव फक्त धार्मिक विधींपुरता मर्यादित न ठेवता समाजातील घटकांना त्याचा थेट फायदा व्हावा, हा 'पुजारी नगरचा राजा' मंडळाचा उद्देश आहे. कॉलनीत मुरुम भरणी व फवारणीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आगामी रक्तदान व अन्नदान शिबीरातही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे."
— गणेश विश्वनाथ पुजारी (संस्थापक अध्यक्ष, पुजारी नगर फाऊंडेशन)
0 Comments