काटी | "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
आई म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर कदाचित शब्दांत मांडणे कठीण आहे, पण माझ्या आईकडे, कै. सौ. कमल अभिमान माने यांच्याकडे पाहिले की, त्या शब्दाला एक मूर्त स्वरूप मिळते. आज 'मदर्स डे' निमित्त तिच्या संघर्षाची आणि त्यागाची ही गाथा 'ओनली न्यूज धाराशिव'च्या वाचकांसाठी...
लहानपणीच पडली संसाराची धुरा
तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील एका संपन्न कुटुंबात जन्म होऊनही आईच्या नशिबी सुरुवातीपासूनच संघर्ष आला. अवघ्या चौथीत असताना शाळा सुटली आणि वयाच्या १२-१३ व्या वर्षी लग्न होऊन ती सासरी आली. वडील लष्करात (मिलेट्री) असल्याने ते सीमेवर देशाचे रक्षण करत होते, तर आई एकटी गावी राहून सासरच्या जाचाला आणि कौटुंबिक संघर्षाला धैर्याने सामोरी जात होती.
विदारक संघर्ष आणि स्वाभिमानी आयुष्य
हस्तलिखितातील पाने उलटताना डोळ्यांत पाणी येते, जेव्हा कळते की, वडील कर्तव्यावर असताना आईला घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. तिच्या हक्काच्या माहेरानेही तिला नाकारले. पण आई डगमगली नाही. "मुले शिकली पाहिजेत आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजेत," हा एकच ध्यास तिने उराशी बाळगला होता. स्वतःच्या वाट्याला आलेल्या अज्ञानाचे अंधार तिच्या मुलांच्या आयुष्यात येऊ नये, म्हणून तिने सोलापूरला भाड्याच्या घरात राहून आमचे शिक्षण पूर्ण केले.
कष्ट वडिलांचे, संस्कार आईचे
आमचे वडील अभिमान माने यांनी १८ वर्षे सैन्यात आणि १५ वर्षे एस.टी. महामंडळात चालक म्हणून अहोरात्र कष्ट केले. पण त्या कष्टाचे चीज करून घरात संस्कारांची गोकुळ निर्माण करण्याचे काम आईने केले. तिने कधीही परिस्थितीचे भांडवल केले नाही. मुलांच्या शिक्षणासाठी तिने स्वतःची सुखे त्यागली. आज आम्ही तिन्ही भावंडे उच्चशिक्षित आहोत: १. ब्रह्मदेव (ब्रह्मा): बी.ई. कॉम्प्युटर इंजिनिअर (सध्या अमेरिकेत कार्यरत). २. विष्णू: एम.बी.बी.एस, एम.डी. (कार्डिओलॉजिस्ट). ३. महेश: बी.ई. इलेक्ट्रिकल.
आम्ही आज जी प्रगती केली आहे, त्याचे सर्व श्रेय आईच्या त्या कणखर स्वभावाला आणि जिद्दीला जाते.
दुसऱ्यांच्या आयुष्यातही पेरले आनंदाचे बीज
आईचा स्वभाव केवळ आपल्या कुटुंबापुरता मर्यादित नव्हता. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत संसार करूनही तिने समाजाप्रती आपले कर्तव्य जपले. अडीअडचणीत असलेल्या अनेक गरजू लोकांना तिने आणि वडिलांनी तब्बल २२ लाखांहून अधिक रुपयांची विना-व्याजी मदत केली. लोकांचे शिक्षण, मुलींची लग्ने आणि आजारपणासाठी तिने नेहमी मदतीचा हात पुढे केला.
एक अधुरी कहाणी...
आज आम्ही सर्व मुले यशाच्या शिखरावर आहोत, पण हे यश पाहायला ती आज आमच्यात नाही. १४ सप्टेंबर २०१० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. तिच्या निधनाच्या अवघ्या काही दिवसांनंतर दादा (ब्रह्मदेव) अमेरिकेला गेला आणि विष्णू एम.डी. झाला. तिची ही स्वप्ने सत्यात उतरली, पण ती पाहण्यासाठी तिचा आधार आमच्यासोबत नव्हता.
आई, तू आमच्यासाठी केवळ जन्मदात्री नव्हतीस, तर तू आमची प्रेरणा होतीस. तुझा संघर्ष, तुझा स्वाभिमान आणि तुझी माया आमच्या आयुष्याचा पाया आहे. आजच्या मदर्स डे निमित्त, जगातील प्रत्येक अशा आईला सलाम, जी स्वतः जळून आपल्या मुलांच्या आयुष्यात प्रकाशाचा दिवा लावते.
- शब्दांकन: महेश अभिमान माने, गंजेवाडी (ता. तुळजापूर)
0 Comments