"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखत यंदाच्या दहावीच्या निकालात दिमाखदार यश संपादन केले आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत (एसएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, प्रशालेने तब्बल ९५.६० टक्के निकालाची उज्वल नोंद करत तालुक्यात मानाचा तुरा रोवला आहे.
यावर्षी प्रशालेतील ६९ विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे ३० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.
प्रशालेतील ज्ञानेश्वरी बलभीम डोके हिने ९३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. बद्रीनाथ रामचंद्र राऊत याने ९१.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर श्रावणी महेश मगर हिने ९१ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांकावर झेप घेतली.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे मुख्याध्यापक रमाकांत गुरव यांच्यासह शिक्षक शुभकिरण मोहिते, अकबर मुलाणी आणि नितीन वाघमोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सावरगाव प्रशालेतील विद्यार्थ्यांनी एसएससी बोर्ड परीक्षेत केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल पवार, मुख्याध्यापक रमाकांत गुरव, गावातील पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments