ध्वजारोहण सोहळा: एकलव्य विद्या संकुल (मंगरूळ यमगरवाडी) येथे ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करताना मुख्य पाहुणे प्रशांत संकपाळ. सोबत मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे व इतर मान्यवर.
'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
"देशाचा विकास केवळ भाषणांनी नव्हे, तर नागरिकांच्या आचरणातील प्रामाणिकपणा आणि देशभक्तीने होतो. प्रत्येक क्षेत्रात निष्ठेने काम करणे आणि राष्ट्रहित जपणी हीच खरी राष्ट्रसेवा आहे," असे प्रतिपादन 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे तुळजापूर समन्वयक प्रशांत संकपाळ यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ यमगरवाडी येथील 'एकलव्य विद्या संकुल'मध्ये ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साही, आनंदी आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत संकपाळ बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून प्रणिता शेटकार उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांचे मंत्रमुग्ध करणारे सांस्कृतिक सादरीकरण
ध्वजारोहण सोहळ्यानंतर संकुलातील विद्यार्थ्यांनी सलग दीड तास बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
लेझीम व देशभक्तीपर नृत्य: इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या कडक लेझीम नृत्याने आणि सातवीच्या विद्यार्थिनींच्या देशभक्तीपर समूहनृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
गजर ढोल-ताशांचा: विद्यार्थ्यांच्या ढोल-ताशा वादनाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या नादाने दुमदुमून गेला.
ओघवतील भाषणे: शिनू कूलमुळे, सृष्टी यमगर, देवयानी रणदिवे आणि पायल जाधव या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित करणारी मनोगते व्यक्त केली.
गुणांचा गौरव: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून एकलव्य विद्या संकुलातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविताना प्रमुख पाहुणे प्रशांत संकपाळ, प्रणिता शेटकार आणि इतर मान्यवर.
गुणवंत विद्यार्थ्यांवर पारितोषिकांचा वर्षाव
दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला:
१. डॉ. आदिनाथ राजगुरू परिवार पारितोषिक: धाराशिव येथील सुप्रसिद्ध डॉ. राजगुरू परिवाराच्या वतीने सलग १६ व्या वर्षी इयत्ता दहावीतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना (अनुक्रमे रु. ५,०००/-, रु. ३,०००/- व रु. २,०००/- आणि नवीन वस्त्रे) देण्यात आले. संस्कार शेरखाने, सुरडकर व कुमारी मेंडके यांनी हे पारितोषिक पटकावले.
२. मुक्ताई प्रतिष्ठाण गौरव: मुक्ताई प्रतिष्ठाण, धाराशिवतर्फे सर्व विषयांत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन विशेष गौरव करण्यात आला.
३. माजी मुख्याध्यापक विजय शहापूरकर पारितोषिक: सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय शहापूरकर यांच्या वतीने विविध श्रेणीत यश मिळवलेल्या मुले व मुलींना प्रोत्साहनपर रोख रकमा बहाल करण्यात आल्या.
सामाजिक बांधीलकी आणि उपक्रम
अन्नदान व खाऊ वाटप: मगर सांगवी येथील महेश पाटील यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपाहार (न्याहारी) तर प्रशांत संकपाळ यांच्यातर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.
व्यसनमुक्ती व परीक्षा पारदर्शकता शपथ: राज्य शासनाच्या धोरणानुसार संपूर्ण संकुलात तंबाखूमुक्ती आणि कॉपीमुक्त अभियानाची गांभीर्याने शपथ घेण्यात आली.
राष्ट्रभक्तीचा संदेश: एकलव्य विद्या संकुल (मंगरूळ यमगरवाडी) येथे ध्वजारोहण प्रसंगी मार्गदर्शन करताना 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रशांत संकपाळ. सोबत व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.
मार्गदर्शन व प्रेरणादायी विचार
प्रमुख वक्त्या प्रणिता शेटकार यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा पट उलगडून दाखवला. तर प्रशांत संकपाळ यांनी, "यमगरवाडीतील या पावन संकुलात उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घेऊन उच्च शिक्षण घ्यावे आणि अद्ययावत समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करावे," असे आवाहन केले. तसेच, आपल्या आईच्या प्रेरणेतूनच आपल्याला या सामाजिक कार्यात योगदान देण्याची संधी मिळाल्याचे भावुक उद्गार त्यांनी काढले.
सुयोग्य नियोजन व मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी रुपाली गिरी, श्रावणी पाटोळे व अस्मिता भोजने यांनी केले, तर समृद्धी कोल्हटकर हिने उपस्थितांचे आभार मानले. सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल घुगे, अण्णासाहेब मगर आणि त्यांच्या विद्यार्थी चमूने कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.
या प्रसंगी सोलापूरचे निवृत्त रेल्वे अधिकारी मार्तंड चावरे, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब कोल्हटकर, अशोक बनकर, संतोष बनसोडे, हरीश मगदूम, दयानंद भडंगे, बालाजी क्षीरसागर, माधव पाटील, संतोष शितोळे, निर्मला हुग्गे, संगीता पाचंगे, फुलाजी ताटीकुंडलवार, तुळजापूर सोलर एजन्सीचे व्यवस्थापक भिसे, संकुलातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि तुळजापूर-धाराशिव परिसरातील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments