Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर तालुका क्षयरोगमुक्तीकडे! तब्बल ७६ ग्रामपंचायतींचा 'टीबी मुक्त' पुरस्काराने गौरव

'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
क्षयरोग (टीबी) निर्मूलनाच्या लढ्यात तुळजापूर तालुक्याने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, तालुक्यातील तब्बल ७६ ग्रामपंचायतींनी 'टीबी मुक्त' होण्याचा बहुमान मिळवला आहे. पंचायत समितीच्या सभागृहात आज, १२ ऑगस्ट रोजी आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात या ग्रामपंचायतींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये ५३ ग्रामपंचायतींना रौप्य, तर २२ ग्रामपंचायतींना ताम्र पदक देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, तालुक्यातील 'हगलूर' ही एकमेव ग्रामपंचायत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली असून, तिचा जिल्हा स्तरावर विशेष गौरव केला जाणार आहे. प्रशस्तीपत्र, राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी उपसभापती रोहिणीताई मेलगिरी, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रमजानअली शेख, जिल्हा परिषद सदस्य दयानंद शिंदे, पंचायत समिती सदस्य किसन देडे आणि वैभव मरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रतिकारशक्ती सुदृढ ठेवणे काळाची गरज: डॉ. उमाकांत बिराजदार
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांनी आरोग्याचा मूलमंत्र दिला.

"टीबीचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रथिनायुक्त (प्रोटीन) पोषक आहार घेऊन आपली प्रतिकारशक्ती सुदृढ ठेवणं गरजेचं आहे. आज पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींनी आरोग्य आणि स्वच्छतेबाबत घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत," असे डॉ. बिराजदार म्हणाले.

पुढील ध्येय सुवर्णपदक; दानशूर व्यक्तींनी पुढे यावे: डॉ. रमजानअली शेख
जिल्हा क्षयरोग केंद्राचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रमजानअली शेख यांनी रौप्य व ताम्र पदक विजेत्या गावांना पुढील वर्षी सुवर्णपदक मिळवण्यासाठीचे मार्गदर्शन केले. तसेच, समाजातील दानशूर व्यक्ती, सरपंच, जि.प. व पं.स. सदस्यांनी क्षयरुग्णांना पोषण आहार किट देण्यासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

संपूर्ण तालुका 'टीबी मुक्त' करेपर्यंत घोडदौड थांबणार नाही: विक्रमसिंह देशमुख
अध्यक्षीय भाषणात सभापती विक्रमसिंह देशमुख यांनी पुरस्कारप्राप्त गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले.

"तुळजापूर तालुक्यातून क्षरोगाचे समूळ उच्चाटन करेपर्यंत आपली ही घोडदौड अशीच सुरू राहील. यासाठी आरोग्य विभागाला आणि कर्मचाऱ्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य प्राधान्याने पुरवले जाईल," अशी ग्वाही त्यांनी दिली.

महिला सरपंचांची लक्षणीय उपस्थिती
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पुरस्कार स्वीकारण्यासाठी तालुक्यातील महिला सरपंचांची उपस्थिती लक्षणीय होती. यासोबतच विविध गटांचे जि.प. व पं.स. सदस्य, आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जिल्हा क्षयरोग केंद्राचे जिल्हा पर्यवेक्षक शरदकुमार बोने यांनी केले. यावेळी जिल्हास्तरीय पर्यवेक्षक सुनील उंडरे यांचीही उपस्थिती होती. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी क्षयरोग पथक तुळजापूरचे महेश पाठक, देविदास जाधव, तसेच पंचायत समिती व तालुका आरोग्य कार्यालयातील तीर्थकर आप्पा, गुरु बेद्रे, तानाजी क्षीरसागर, बालाजी शिंदे,रामानंद भिसे, विनोद मोरे, विशाल माळी, शहाजी आवटे, प्रवीण आवले, शशी साळुंखे, अजय गायकवाड, सतीश सातपुते, सूरज ढेरे आणि दीपक माळी या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments