Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

‘सेमी इंग्रजी’च्या निर्णयावरून शिक्षण विभागाला धारेवर धरले; शाळा एकत्रीकरणही थांबविण्याची मागणीजि.प. सदस्या सिमाताई माडजे यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन; शिक्षकांना प्रशिक्षण न देता सेमी इंग्रजी सुरू करण्यास विरोध


"Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत ‘सेमी इंग्रजी’ विषय सुरू करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, तसेच शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन देऊनच त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सौ. सिमाताई भैरवनाथ माडजे यांनी केली आहे. यासोबतच जिल्ह्यातील शाळांचे एकत्रीकरण (समायोजन) करू नये, अशीही मागणी त्यांनी शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पूर्वीच्या मागणीनुसार मराठी माध्यमाची पाठ्यपुस्तके शाळांना पोहोचली. आता सेमी इंग्रजीला मान्यता मिळाल्यानंतर इंग्रजी माध्यमाची पुस्तके देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘प्रशिक्षणाविना अंमलबजावणी नको’
सेमी इंग्रजी सुरू करण्याचा निर्णय घेताना जिल्ह्यातील शिक्षण व प्रशिक्षण यंत्रणेतील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व विषय साधनव्यक्ती यांच्याशी सविस्तर चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक असल्याचे माडजे यांनी म्हटले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास एक महिना उलटला असताना शिक्षकांना अद्याप आवश्यक प्रशिक्षण मिळालेले नाही, त्यामुळे प्रशिक्षणाशिवाय सेमी इंग्रजीची अंमलबजावणी करणे योग्य ठरणार नाही, असा आक्षेप त्यांनी नोंदविला आहे.
मुलांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या नैसर्गिक वाढीच्या टप्प्यानुसार आणि योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. अचानक माध्यमातील बदलामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनावर तसेच आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या निर्णयाचा शैक्षणिक आणि मानसिकदृष्ट्या सखोल विचार करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी
सेमी इंग्रजीच्या अंमलबजावणीसंदर्भात तज्ज्ञ शिक्षक, डायटचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची समिती गठित करून नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यासक्रम लागू करावा, अशी मागणी माडजे यांनी केली आहे.

शाळा एकत्रीकरणालाही विरोध; ‘ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल’
दरम्यान, जिल्ह्यातील शाळा एकत्रीकरणाच्या प्रस्तावालाही सिमाताई माडजे यांनी विरोध दर्शविला आहे. तुळजापूर तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांचे एकत्रीकरण केल्यास काही ठिकाणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरणार असून काही शाळांमध्ये मनुष्यबळाची कमतरता निर्माण होणार असल्याचा दावा त्यांनी निवेदनात केला आहे.
आळणी (बु.), अणदूर, मंगरूळ, काटी, सावरगाव, जळकोट आणि नंदगाव आदी शाळांबाबत मनुष्यबळाच्या उपलब्धतेचे वेगवेगळे प्रश्न असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एका बाजूला काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असताना दुसऱ्या बाजूला शाळा एकत्रीकरणामुळे काही ठिकाणी शिक्षक व इतर कर्मचारी अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाची स्थानिक पातळीवर योग्य तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘शाळा बंद करण्याऐवजी सक्षम करा’
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूर जावे लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवरील शाळा सुरू ठेवून त्या अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. शाळा एकत्रीकरणामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने संबंधित शाळांबाबत फेरविचार करून त्या पूर्ववत सुरू ठेवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील शाळा टिकविणे हा उद्देश असताना कोणताही निर्णय घाईघाईने न घेता त्याचे दूरगामी परिणाम तपासणे गरजेचे आहे, अशी भूमिका सिमाताई माडजे यांनी निवेदनातून मांडली आहे.

सेमी इंग्रजीबाबत माडजे यांच्या प्रमुख मागण्या
पहिली ते पाचवीच्या सेमी इंग्रजी निर्णयाचा पुनर्विचार करावा.
शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण दिल्यानंतरच अंमलबजावणी करावी.
तज्ज्ञ शिक्षक, डायट प्राचार्य व शिक्षणाधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी.
विद्यार्थ्यांच्या आकलन व आत्मविश्वासावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करावा.
शाळा एकत्रीकरणाचा निर्णय स्थानिक परिस्थिती तपासूनच घ्यावा.
एकत्रीकरण प्रस्तावित असलेल्या शाळांचा फेरआढावा घेऊन ग्रामीण शाळा सुरू ठेवाव्यात.

— Only न्यूज धाराशिव

Post a Comment

0 Comments