तुळजापूर | Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा अधिक तीव्र करत आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी तुळजापुरातून आरक्षणाच्या निर्णायक लढ्याची रणशिंग फुंकले. "२९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंदोलनातून आता माघार नाही. मरोस्तवर बसायला तयार आहोत. अंतरवली जाम झाली की सरकार गेले," अशा अत्यंत आक्रमक शब्दांत त्यांनी तुळजापुरातून राज्य सरकारला थेट इशारा दिला.
शहरातील लोहिया मंगल कार्यालयात आयोजित मराठा समाजबांधव व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत थे. व्यासपीठावर सज्जनराव साळुंके, महेश गवळी, धैर्यशील कापसे, कुमार टोले, अर्जुन साळुंके यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख मराठा समन्वयक उपस्थित होते.
माध्यम क्रांती आणि गावागावांत जनजागृतीचे आवाहन
बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जरांगे पाटील म्हणाले, "गोरगरीब मराठ्यांच्या कल्याणासाठी प्रत्येकाने या आंदोलनात योगदान दिले पाहिजे. मराठ्यांनी गावोगाव पिंजून काढून जनजागृती करावी. आपल्या जातीच्या हक्कासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकायला लाज कशाची? आंदोलनाची प्रत्येक माहिती आणि पोस्ट रोज मोबाईलवर शेअर करून रान पेटवून द्या."
सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका
कुणबी नोंदी रद्द करण्याच्या हालचालींवरून जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार संजय शिरसाट यांच्यावर सडकून टीका केली. "गोड बोलून, गुळ चारून मारण्याचा हा राजकीय कट आहे. दडपशाही आणि दादागिरी करून नोंदी रद्द करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. मात्र, मराठा समाज हे षड्यंत्र कधीही सहन करणार नाही," असा घणाघात त्यांनी केला.
तुळजापुरात भव्य स्वागत; सोलापूरकडे रवाना
पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या आशीर्वादाने केल्याचे सांगत जरांगे पाटील यांचे शहरात आगमन होताच धाराशिव रस्त्यावरील उड्डाणपुलाखाली मराठा बांधवांनी अभूतपूर्व स्वागत केले. शुक्रवारी रात्री तुळजापुरात मुक्काम केल्यानंतर शनिवारी सकाळी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन ते सोलापूरच्या दिशेने सावरगावकडे रवाना झाले.
> तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक सावरगाव येथे सदिच्छा भेट
मराठा आरक्षणाच्या लढ्यातील अग्रगण्य नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या बहुप्रतीक्षित पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा शुभारंभ होत असताना, शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी साडे अकराच्या दरम्यान ते तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक सावरगाव येथे भेट देणार आहेत. या दौऱ्यामुळे सावरगावसह संपूर्ण पंचक्रोशीतील वातावरण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा पेटून उठले असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन संवादाचा नारळ फुटणार
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे-पाटील यांचे सावरगाव येथे आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भव्य शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करून ते अभिवादन करतील. त्यानंतर छत्रपतींच्या साक्षीनं उपस्थित हजारो शिवप्रेमी, मराठा बांधव आणि स्थानिक नागरिकांशी ते थेट संवाद साधणार आहेत. या सदिच्छा भेटीदरम्यान आरक्षणाच्या आगामी दिशा, कायदेशीर लढा आणि समाजाची एकजूट यावर ते रोखठोक भाष्य करण्याची शक्यता आहे.
भव्य स्वागत आणि जय्यत तयारी: जरांगे-पाटील यांच्या स्वागतासाठी सावरगावात ठिकठिकाणी भगवे ध्वज, फलक आणि कमानी उभारण्यात आल्या असून संपूर्ण गाव भगवेमय झाले आहे.
> - 'Only न्युज धाराशिव' विशेष – काय आहेत मुख्य मागण्या?
गॅझेट लागू करा: हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅझेटनुसार मराठा समाजाला तत्काळ कुणबी प्रमाणपत्रे मिळायला हवीत.
सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी: 'सगेसोयरे' अध्यादेशाची परिपत्रकानुसार कठोर अंमलबजावणी करून त्याची कायदेशीर अंमलबजावणी झाली पाहिजे.
गुन्हे मागे घ्या: आतापर्यंतच्या सर्व मराठा आरक्षणे आंदोलकांवरील दाखल झालेले राजकीय गुन्हे बिनशर्त मागे घेण्यात यावेत.
आरक्षणाची हमी: सरसकट मराठा समाजाचा 'ओबीसी' प्रवर्गात समावेश करून हक्काचे टिकणारे आरक्षण मिळालेच पाहिजे.
0 Comments