Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तामलवाडीच्या सरस्वती विद्यालयाची कुस्तीच्या आखाड्यात दमदार भरारी!तालुकास्तरीय स्पर्धेत तब्बल सात सुवर्ण कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची आगेकूच

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी आरळी बु. येथे तालुकास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत तब्बल सात प्रथम क्रमांक पटकावले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात ४१ किलो वजन गटातून समर्थ नामदेव नरवडे, ४० किलो वजन गटातून आदर्श चांगदेव हजारे आणि ६८ किलो वजन गटातून श्रेयश गणेश मते यांनी प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली.
तर १४ वर्षांखालील मुलींच्या गटात ४० किलो वजन गटातून आस्मा सादीक शेख आणि ४८ किलो वजन गटातून सोया जाहगीरदार यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटातही सरस्वती विद्यालयाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. ४८ किलो वजन गटातून वैष्णवी देवकर, तर ६८ किलो वजन गटातून सानिया बाळासाहेब कोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

या सर्व विजयी खेळाडूंची आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांच्या यशाबद्दल विद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीचे विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुहास वडणे, पर्यवेक्षक महादेव मसुते, तसेच संस्थेचे अध्यक्ष बसवणप्पा चंद्रकांत मसुते, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सचिव यशवंत (आण्णा) बलभीम लोंढे, संचालक नागनाथ मसुते, जितेंद्र माळी, महेश जगताप, अब्बासभाई पटेल, मल्लिकार्जुन मसुते व बाळासाहेब जगताप यांच्यासह प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

या यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक महादेव माळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे पालकांसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून कौतुक होत असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments