‘Only न्यूज धाराशिव’ वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी देवीचे अधिष्ठान आणि मुंबईच्या 'लालबागचा राजा' यांच्यातील अनोख्या अध्यात्मिक बंधाची साक्ष देणारी १७ वर्षांची भक्तिमय परंपरा यंदाही अत्यंत श्रद्धेने आणि दिमाखात पार पडली. तुळजापूरचे माजी नगरसेवक तथा पुजारी विशाल रोचकरी परिवाराच्या वतीने आणि तुळजापूरवासीयांच्या भावनेचे प्रतीक म्हणून आई तुळजाभवानीच्या चरणी अर्पण केलेल्या तब्बल १,८०८ पवित्र कवड्यांची विशेष माळ मुंबईतील ‘लालबागच्या राजा’च्या गळ्यात व चरणी अर्पण करण्यात आली.
तुळजापूरची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाचा हा मिलाफ केवळ एक धार्मिक विधी न राहता, संपूर्ण महाराष्ट्राच्या कल्याणकारी सिद्धीसाठी बांधली गेलेली एक अतूट भक्तीची साखळी बनली आहे.
आई तुळजाभवानीच्या कुंकवाचा स्पर्श अन् राजाचा गळा
तुळजापूर येथील रोचकरी परिवाराने गेल्या १७ वर्षांपासून ही विशेष सेवा व्रतस्थपणे सांभाळली आहे. आई तुळजाभवानी देवीच्या मूळ पिंडीला स्पर्श करून, देवीच्या चरणांवरील श्रीफळ, वस्त्र आणि कुंकवाचा पवित्र प्रसाद या कवड्यांच्या माळेला लावण्यात येतो. त्यानंतर अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात ही १,८०८ कवड्यांची माळ मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणली जाते. यंदाही राजाच्या गळ्यात ही माळ परिधान करून तुळजापूरकरांच्या वतीने नतमस्तक होत विशेष आरती करण्यात आली.
या सोहळ्या प्रसंगी चि. विराज रोचकरी, चि. सिद्धिविनायक रोचकरी, चि. सार्थक रोचकरी यांच्यासह रोचकरी परिवारातील सदस्य, धाराशिव जिल्ह्यातील भाविक आणि लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
'महाराष्ट्रावरचा दुष्काळ हटवा अन् बळीराजा सुखी होऊ दे!'; साकडे
यावेळी तुळजाभवानी माता आणि श्री गणरायाच्या चरणी संपूर्ण राज्याच्या समृद्धीसाठी साकडे घालण्यात आले. महाराष्ट्रावरील अवकाळी संकट, दुष्काळाचे सावट दूर होऊन शेतकरी बांधव चिंतामुक्त व्हावा, राज्यात सर्वत्र सुकाळ आणि समृद्धी नांदावी, अशी आर्त हाक यावेळी रोचकरी परिवाराच्या वतीने मारण्यात आली.
"आई तुळजाभवानीच्या चरणी असलेली अढळ श्रद्धा आणि विघ्नहर्त्या श्री गणरायावरील अनन्य भक्ती हीच आमच्या रोचकरी परिवाराची मुख्य ऊर्जा आहे. महाराष्ट्रातील बळीराजा सुखी व्हावा, शेती पिकांची भरभराट व्हावी आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद-आरोग्य नांदावे, हीच लालबागच्या राजाच्या चरणी आमची प्रार्थना आहे."
— विशाल रोचकरी (माजी नगरसेवक तथा पुजारी, तुळजापूर)
0 Comments