Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पाणीपुरवठा विस्कळीत; तामलवाडीत २८ सप्टेंबरला ग्रामपंचायतीवर 'घागर मोर्चा'चा इशारा; तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांचा संताप; प्रशासन हतबल

काटी | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील दलित वस्तीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत व अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, येत्या २७ सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास २८ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक ‘घागर मोर्चा’ काढण्याचा सज्जड इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तामलवाडी येथील दलित वस्तीतील पाणीपुरवठा पूर्ववत आणि नियमित करावा, या मागणीसाठी श्री. धम्मपाल सुनील रणसुरे यांनी २३ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत प्रशासनाकडे रितसर लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, ग्रामसेवक चैतन्य गोरे व स्थानिक प्रशासनाने या गंभीर निवेदनाची कोणतीही दखल न घेता त्याकडे दुर्लक्ष केले.

तक्रारीची दखल न घेतली गेल्याने धम्मपाल रणसुरे यांनी माजी सैनिक तथा 'आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे'चे संस्थापक अध्यक्ष श्री. सावंत शिवाजी रामकृष्ण यांची भेट घेऊन वस्तीतील तीव्र पाणीटंचाईची माहिती दिली. यानंतर सावंत यांनी २४ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष दलित वस्तीत जाऊन तेथील पाणीपुरवठ्याची पाहणी केली. या वेळी स्थानिक महिला व नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली भटकंती व हाल आपणांसमोर मांडले.   


मूलभूत हक्कांवर गदा; प्रशासनाला अंतिम इशारा
पाणी हा मूलभूत हक्क असताना प्रशासनाकडून अनुसूचित जाती-जमाती वस्तीतील नागरिकांवर अन्याय केला जात असल्याचे सांगत, सावंत शिवाजी रामकृष्ण व धम्मपाल रणसुरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक, तुळजापूरचे गटविकास अधिकारी (BDO) आणि तहसीलदार यांना व्हॉट्सॲप व निवेदनाद्वारे अंतिम इशारा देण्यात आला आहे.   

दिनांक २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास, २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता वस्तीतील महिला व नागरिक रिकाम्या घागरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर 'घागर मोर्चा' नेतील. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे.   

या निवेदनावर सावंत शिवाजी रामकृष्ण, धम्मपाल रणसुरे, महादेव कांबळे, सुखदेव रणसुरे, किसन कसबे, दत्ता रणसुरे, अल्ताफ शेख, अलका रणसुरे, सुनील रणसुरे, लक्ष्मी गायकवाड यांच्यासह वस्तीतील अनेक नागरिक व महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या घटनेमुळे तामलवाडी आणि परिसरात ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात मोठा असंतोष पसरला असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या मोर्चाकडे लागले आहे.

Post a Comment

0 Comments