तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
तुळजापूर तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत येथील श्री बाळेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मैदानी क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या जोरावर या विद्यार्थिनींनी विविध क्रीडा प्रकारांत पदकांची लुटालूट केली.
या स्पर्धेत कु. दीक्षा शिवमूर्ती बोने हिने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करत थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक आणि हातोडाफेक या चारही क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णयशाची नोंद केली. तिच्या या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे.
तसेच कु. श्रावणी शंकर कानडे हिने हातोडाफेक स्पर्धेत द्वितीय, तर थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळवून दुहेरी यश संपादन केले. क्रीडा प्रकारात सातत्य राखत कु. श्रावणी ज्योर्तिलिंग मेनकुदळे हिने गोळाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाच्या यशातील गोडवा वाढवला.
या यशस्वी विद्यार्थिनींना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक विठ्ठल नाईक आणि मुख्याध्यापक राजेंद्र हजारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थिनींच्या या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे सचिव रामचंद्र दादा आलुरे तसेच मार्गदर्शक व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. लक्ष्मीकांत पाटील यांनी सर्व विजेत्या विद्यार्थिनी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले. "मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर बाळेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मिळविलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद असून भविष्यात त्या जिल्हा व राज्य पातळीवर नक्कीच गरुडभरारी घेतील," असा विश्वास व्यक्त करत त्यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments