तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचलित तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ -यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे एकलव्य विद्या संकुलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
१७ वर्षांखालील (U-17) गटात विश्वजीत जाधव याने ३ हजार मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानेच १ हजार ५०० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले. ओंकार निंबाळकर याने ३ हजार मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. तसेच कुणाल चव्हाण याने उंच उडीमध्ये विशेष नैपुण्य दाखवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
१४ वर्षांखालील (U-14) गटातही एकलव्यच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवला. प्रणय सुपलकर याने १०० मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. ओमकार गदेवाड याने ४०० मीटर धावणे व ८० मीटर हर्डल्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला. दिनेश चव्हाण याने ४०० मीटरमध्ये तृतीय, तर २०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. सत्यजित जाधव याने ६०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
याशिवाय प्रणय, प्रतीक, ओमकार आणि मेघराज यांच्या संघाने U-14 माध्यमिक रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत संघभावनेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी खेळाडू तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे यशवंत निंबाळकर यांचे भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव काळे, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, कार्यवाह विवेक अयाचित, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब कोल्हटकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
एकलव्य विद्या संकुलाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
0 Comments