'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
"शाळा सुटली, मैत्री तुटली नाही..." या उक्तीची प्रचिती देत आणि काळाच्या ओघात कामानिमित्त दूरवर विखुरलेल्या मित्रांना पुन्हा एकदा एकाच छताखाली आणत, काटी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या १९८७-८८ च्या दहावीच्या तुकडीचा भव्य आणि ऐतिहासिक स्नेहमेळावा (गेट-टुगेदर) शनिवारी (दि. १४) अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. तब्बल ३९ वर्षांनंतर बालपण पुन्हा एकदा जगताना माजी विद्यार्थी आनंदाने भारावून गेले होते.
बालपणीच्या गमतीजमती आणि कर्तृत्वाचा प्रवास
गेल्या ३९ वर्षांपूर्वी याच शाळेच्या बाकड्यावर एकत्र ज्ञानार्जनासाठी बसलेले हे विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, उद्योजक, प्रगतशील शेतकरी, शासकीय अधिकारी तसेच सैनिक अशा विविध उच्च पदांवर आणि क्षेत्रात यशस्वीपणे स्थिरावले आहेत. संसाराच्या आणि नोकरी-व्यवसायाच्या धावपळीत हरवलेल्या बालपणीच्या रम्य आठवणींना उजाळा देण्यासाठी बॅचचे तुकाराम ढगे, अरविंद कोळी, शामराव इंगळे, काका रोडे, चेअरमन संजय साळुंके आणि विकास हंगरकर आदींनी या मेळाव्याची मुहूर्तमेढ रोवली होती.
या मेळाव्यात अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांनी परस्परांशी संवाद साधताना आपण सध्या काय करत आहोत, आपल्या संसाराची गाडी कशी सुरू आहे, तसेच आपली मुले उच्च शिक्षण घेऊन कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करत आहेत, याची सविस्तर माहिती एकमेकांसोबत आनंदात वाटून घेतली. या सुख-दुःखाच्या देवाणघेवाणीने जुन्या मैत्रीचे बंध आणखी घट्ट झाले.
दिवंगत सहकाऱ्यांना आणि गुरुजनांना आदरांजली
हा आनंदोत्सव साजरा करतानाच, काळाच्या पडद्याआड गेलेल्या परंतु कायम मनाच्या जवळ असणाऱ्या आपल्या वर्गमित्रांना आणि ज्यांनी आपल्याला ज्ञान दिले ते गुरुजन जे आज आपल्यात नाहीत, त्यांना या कार्यक्रमात अत्यंत जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत झालेल्या सवंगड्यांच्या आणि शिक्षकांच्या आठवणींना उजाळा देताच उपस्थित सर्वच जण भावूक झाले होते.
गुरुजनांचा अश्रू अनावर करणारा सत्कार
या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे ज्ञानदानाचे पवित्र व्रत पार पाडणाऱ्या सेवानिवृत्त गुरुजनांचा सन्मान. शाळेच्या मुख्य प्रवेशদ্বारापासूनच सेवानिवृत्त शिक्षक बी.एस. माने, एकनाथ लोखंडे आणि विलास देशपांडे या गुरुजनांच्या डोक्यावर फुलांची मुक्त उधळण करत अत्यंत जंगी आणि भावूक स्वागत करण्यात आले. ज्यांच्या संस्कारांमुळे आज आपण या उच्च पदावर पोहोचलो, त्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करताना अनेक माजी विद्यार्थ्यांचे मन भरून आले.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक बी.एस. माने सर जुन्या आठवणी सांगताना कमालीचे भावुक झाले. "तिथं रामायण लावलं होतं... शाळेच्या ग्राऊंडवर रामायण झालं होतं... विद्यार्थ्यांच्या घरी मुक्काम आणि त्यांचे आदरातिथ्य मी कधीही विसरू शकणार नाही," अशा शब्दांत त्यांनी सुवर्णकाळाला उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा सरपंच सुजित (भैय्या)हंगरगेकर यांनी, "आपला जन्म समाजाचे ऋण फेडण्यासाठीच झाला आहे," असे सांगत माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले. तर अध्यक्षीय भाषणात माजी सरपंच बापुसाहेब (दादा) देशमुख यांनी "समर्पणाशिवाय जगाचा कोणताही इतिहास घडत नाही," असे महत्त्वपूर्ण उद्गार काढत दुष्काळी परिस्थितीत एकमेकांना आधार देण्याची आणि गावाची काळजी घेण्याची साद घातली.
"शाळा सुटली, संसाराच्या आणि व्यवसायाच्या धबडग्यात सगळे वेगवेगळ्या वाटेने दुरावलो; पण बालपणीच्या त्या निरागस मैत्रीची ओढ कधीच कमी झाली नाही. तब्बल ३९ वर्षांनंतर जेव्हा हे सगळे मित्र पुन्हा त्याच बाकड्यावर आणि त्याच शाळेच्या प्रांगणात एकत्र आले, तेव्हा असे वाटले की आम्ही पुन्हा एकदा त्याच लहान मुलांच्या विश्वात परतलो आहोत. मित्र आणि गुरुजनांवरील प्रेमापोटी दूरवरून धावून आलेल्या सर्वांच्या उपस्थितीने आमचे आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध झाले."
--तुकाराम ढगे,माजी विद्यार्थी जि.प.प्रशाला काटी
"आजच्या या धकाधकीच्या युगात जुन्या मित्रांना भेटणे आणि बालपणीच्या रम्य आठवणींना उजाळा देणे हा क्षण आमच्यासाठी अमृतासारखा होता. ज्या गुरुजनांनी आम्हाला घडवले, त्यांच्या पायावर डोके ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण ठरला. या मेळाव्याच्या निमित्ताने आमची तुटलेली कडी पुन्हा जोडली गेली, याचा मनापासून आनंद आहे."
--अविनाश (पंपू) कोळी,
माजी विद्यार्थी,जि.प.प्रशाला काटी
संकल्प आणि सहभाग
महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि अगदी परदेशातूनही या मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी काटी येथे आवर्जून दाखल झाले होते. याप्रसंगी हणमंत ढगे, धैर्यशील गाटे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक नितीन कोळी यांनी देखील उपस्थित राहून शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
स्नेहमेळाव्याची सांगता करताना माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी पाच व्हाईट बोर्ड देण्याची घोषणा केली. त्यानंतर सर्व गुरुजन आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे स्नेहभोजनाचा आस्वाद घेत या सोहळ्याची गोड साक्ष दिली.
0 Comments