तुळजापूर | 'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा
आयुष्याच्या धकाधकीच्या प्रवासात मागे सुटलेले बालपण, कॉलेजच्या कट्ट्यावरील दंगा आणि जुन्या दिवसांच्या सोनेरी आठवणींना उजाळा देणारा क्षण नुकताच तुळजापूर येथे अनुभवास आला. येथील ऐतिहासिक तुळजाभवानी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १९९५ ते २००० सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साही, भारदस्त आणि भावूक वातावरणात पार पडला. या मेळाव्यात जुन्या मित्रांची झालेली भेट आणि शिक्षकांबद्दलची कृतज्ञता यामुळे एक आगळावेगळा भावनिक माहोल तयार झाला होता.
भव्य मिरवणूक आणि आदरांजलीने झाली सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत चैतन्यमय वातावरणात झाली. सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित गुरुजनांच्या सन्मानार्थ एका भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याच्या उत्तरार्धात भूतकाळात महाविद्यालयाची व शिक्षणाची धुरा सांभाळणारे माजी प्राचार्य कै. उत्तमराव देशमुख राखिलकर, काशीद सर, वडगणे सर तसेच याच बॅचमधील वा वाटेत काळाच्या पडद्याआड गेलेले माजी विद्यार्थी कै. नारायण गवळी, कै. गिरीश कुलकर्णी यांच्यासह ज्ञात-अज्ञात आदरणीय प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांना उपस्थितांनी दोन मिनिटे उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
दिग्गजांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन
या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन माजी प्राचार्य रमेश दापके, कॅप्टन बागल, प्राचार्य डॉ. जीवन पवार, प्रा. अर्जुन जाधव, कॅप्टन यशवंत डोके, प्रा. शकुंतला मगर, प्रा. सविता कदम आणि धनंजय लोंढे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विद्यापीठाची माजी प्रतिनिधी अमर परमेश्वर, प्रकाश मगर, प्रमोद (बंटी) अपराध, राजेश मलबा, सचिन देशमुख, अभिमान खराडे, संजय राठोड, अध्यक्ष बंडू मुळे, संजय जाधव, सोपान कदम, राणी धर्माधिकारी, मंजुषा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मैत्रीचे बंध आणि गुरु-विद्यार्थ्यांचा संवाद
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सचिन घोडके यांनी, "या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून केवळ जुन्या आठवणींना उजाळा मिळत नसून, विखुरलेली मने आणि मैत्रीचे घट्ट नाते पुन्हा नव्याने जोडले जात आहे," असे भावनिक उद्गार काढले. तसेच माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने भविष्यात महाविद्यालयाच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासक वचन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी म्हेत्रे यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले.
या सोहळ्यात विशेष आकर्षण ठरले ते प्राचार्य, प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी यांच्यातील प्रश्नोत्तरांचे खुले सत्र. या सत्रात जुन्या किस्स्यांवर हशा पिकला आणि अनेक जुन्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यात आनंदाच्या धारा आणल्या. उपस्थितांना आदराचा भाग म्हणून तुळजाभवानीची प्रतिमा व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
कलागुणांची उकल आणि सांस्कृतिक पर्व
केवळ गप्पा आणि आठवणी नाही, तर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांनी आपल्या छुप्या कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येकाने आपल्या बालपणीच्या आणि तारुण्याच्या दिवसांतली ऊर्जा पुन्हा एकदा या मंचवर अनुभवली.
"आज पंचवीस-तीस वर्षांनंतर माझ्या विद्यार्थ्यांना जीवनाच्या विविध क्षेत्रांत यशस्वी झालेले पाहून एक शिक्षक म्हणून माझे मन अभिमानाने भरून आले आहे. आम्ही लावलेल्या या रोपट्यांचा आज वटवृक्ष झाला आहे. ही केवळ एक भेट नसून, गुरु-शिष्याच्या अतूट नात्याची ही खरी पावती आहे. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी तुम्ही सर्वजण नेहमीच पाठीशी उभे राहाल, हा मला ठाम विश्वास आहे."
— डॉ. रमेश दापके (माजी प्राचार्य, तुळजाभवानी महाविद्यालय)
"काळ कितीही पुढे गेला आणि तंत्रज्ञान कितीही बदलले, तरी महाविद्यालयीन जीवनातील निरागस मैत्री आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार कधीही पुसले जात नाहीत. १९९५ ते २००० या बॅचने आजही तीच आत्मीयता जपली आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा जुन्या दिवसांत रमताना मोठा आनंद होत आहे."
— प्रा. अभिमान हंगरगेकर (माजी प्राध्यापक, तुळजाभवानी महाविद्यालय)
महाविद्यालयाच्या विकासासाठी आणि सामाजिक बांधिलकीसाठी "कोणत्याही शिक्षण संस्थेची खरी ओळख ही तिच्या इमारतीवरून नाही, तर तिने घडवलेल्या सुजाण आणि यशस्वी माजी विद्यार्थ्यांवरून ठरते. आज तुम्ही सर्वजण समाजात आपापल्या क्षेत्रात नाव कमवत आहात, हेच आमच्या शिक्षकी जीवनाचे खरे सार्थक आहे. तुमची ही एकजूट अशीच कायम राहो आणि महाविद्यालयाच्या जडणघडणीत तुमचा सक्रिय सहभाग लाभो, हीच सदिच्छा!"
— डॉ.जीवन पवार (प्राचार्य, तुळजाभवानी महाविद्यालय)
या संपूर्ण स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी महेंद्र कावरे, गुलचंद्र व्यवहारे, संजय काका शिंदे, विष्णू दळवी, लक्ष्मीकांत सुलाखे, सतीश घोगरे, प्रसाद खामकर, किशोर शिंदे, संजय कामे आदींनी अहोरात्र परिश्रम घेतले.
कार्यक्रमास प्रा. बाळासाहेब कुकडे, प्रा.अभिमान हंगरगेकर, प्रा.सतीश वडगावकर, प्रा.एस.एस.जगताप, प्रा.रावसाहेब देशमुख,विनायक मस्के,राजेंद्र घाडगे, तुकाराम शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments