कळंब | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, कळंब येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती व परंपरा तसेच समाजाच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी समाजातील थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर उपस्थितांना आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती आणि परंपरांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास विभागाचे वसतिगृह गृहपाल एल. एम. रचावाड यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते राकेश भैय्या कोमटवार यांनी आदिवासी समाजासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक सुविधा आणि शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले.
“आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देत उपलब्ध शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा तसेच समाजाचा सर्वांगीण विकास साधावा,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते अमोल आण्णा शेळके, रोशन भैय्या कोमटवार, मुकुंद साखरे यांच्यासह आदिवासी बांधव अशोक काळे, नवनाथ काळे, वसतिगृहातील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता वसतिगृह कर्मचारी जी. एम. नन्नवरे यांनी केली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृतीचे जतन, शिक्षणाचा प्रसार आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देण्यात आला.
0 Comments