तामलवाडी येथे रस्त्यापेक्षा दीड ते दोन फूट उंचावर असलेले गटारीचे चेंबर, जे अपघातांना आमंत्रण देत आहे.
काटी | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा डिजीटल मिडिया
तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथे ठेकेदाराने भूमिगत गटारीचे काम अर्धवट सोडल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या जीवाला आणि आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. रस्त्यापासून तब्बल दीड ते दोन फूट उंचावर असलेल्या चेंबरमुळे आणि आजूबाजूला साचलेल्या अस्वच्छ पाण्यामुळे परिसरात डेंग्यू व मलेरियासारख्या साथीच्या रोगांची भीती पसरली आहे. या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
तामलवाडी येथील जैतुन महेबूब शेख यांच्या घरापासून ते महेश जगताप, जहागीर बेगडे व पांडुरंग लोंढे यांच्या घरासमोरील भूमिगत गटारीचे काम सध्या ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे रखडले आहे. गटारीचे चेंबर रस्त्याच्या पातळीपेक्षा दीड ते दोन फूट उंच बांधण्यात आले असून, त्याच्या बाजूला आवश्यकतेनुसार मुरूम किंवा खडीची भराई करण्यात आलेली नाही. तसेच सिमेंट-काँक्रीटचे पाईप योग्य खोलीवर न बसवल्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये दूषित पाणी साचून मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत आहे. यामुळे लहान मुले, महिला व वृद्धांमध्ये डेंग्यू, मलेरिया, त्वचारोग आणि अतिसार यांसारख्या आजारांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अर्धवट भूमिगत गटारीमुळे रस्त्यावर पडलेले खड्डे आणि अस्वच्छ पाणी साचल्यामुळे तामलवाडी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
मंदिराच्या मुख्य पर्यायी रस्त्याची दुरवस्था
हा रस्ता गावातील ग्रामदैवत श्री शंभू महादेव मंदिराकडे जाणारा प्रमुख पर्यायी मार्ग आहे. या मार्गावरून दररोज भाविकांची, शाळकरी मुलांची व महिलांची मोठी वर्दळ असते. रस्त्यावरील उघड्या आणि उंच चेंबरमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अलिकडेच रात्रीच्या अंधारात अशाच एका उंच चेंबरमध्ये पाय अडकून एका वृद्ध नागरिकाचा पाय मोडल्याची गंभीर घटना घडली आहे.
ग्रामसेवकांचे दुर्लक्ष; निवेदनाद्वारे कारवाईची मागणी
याबाबत ग्रामस्थांनी २६ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता ग्रामसेवक गैरहजर होते. फोनवरून संपर्क साधून तोंडी तक्रार नोंदवूनही आजतागायत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. हा प्रकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १२४ अन्वये नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारा आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:
१. उंच उभारलेले चेंबर रस्त्याच्या समपातळीत आणून आजूबाजूला मुरूम व खडी भरून रस्ता समतल करावा.
२. साचलेल्या अस्वच्छ पाण्याचा निचरा करून परिसरात तात्काळ कीटकनाशक औषधे व धूर फवारणी करावी.
३. तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
४. कामाची गुणवत्ता आणि दुरुस्तीची खात्री झाल्याशिवाय ठेकेदाराचे अंतिम देयक (पेमेंट) अदा करू नये.
१० दिवसांचा अल्टीमेटम:
येत्या १० दिवसांत या समस्येवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, तसेच आरोग्य विभागाकडे अधिकृत तक्रार नोंदवण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर माजी सैनिक तथा आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सावंत शिवाजी रामकृष्ण, रियाज जहागीर बेगडे, पांडुरंग गजेंद्र लोंढे, मंदाकिनी लोंढे, सत्यभामा लोंढे, अशोक घोटकर, जैतुन शेख, मन्ना बेगडे, महेबूब शेख या ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी (तुळजापूर), तालुका आरोग्य अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत, जि.प. धाराशिव) यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आली आहे.
0 Comments