Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूरच्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांकडून दर्शन मार्ग अन् पार्किंग व्यवस्थेची पाहणी

​"तुळजापूरच्या प्राचीन गढीत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नवरात्रोत्सवाच्या तयारीचा आढावा: भाविकांच्या सुरक्षेवर विशेष भर."

तुळजापूर | ​'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा डिजिटल मिडिया 
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या आगामी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात प्रशासकीय स्तरावर जय्यत तयारी सुरू झाली आहे. या महोत्सवाच्या नियोजनाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी शहरातील विविध दर्शन मार्ग, पार्किंग स्थळे आणि मंदिर परिसराची पाहणी केली. भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

​यंदा ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सव सुरू होत आहे. या काळात महाराष्ट्र आणि परराज्यातून लाखो भाविक तुळजापुरात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घाटशिळ, हडको मैदान, अग्निशामक दल मैदान तसेच धाराशिव, लातूर आणि नळदुर्ग रोडवरील पार्किंग व्यवस्थांची बारकाईने पाहणी केली. वाहनांची क्षमता, प्रवेश व निर्गमन मार्ग आणि वाहतूक नियंत्रणासाठी स्पष्ट दिशादर्शक फलक (साइनबोर्ड्स) लावण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
​
बिडकर पायऱ्या व दर्शन मार्गाचा आढावा
पार्किंगच्या पाहणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बिडकर पायऱ्यांमार्गे जाणाऱ्या दर्शन मार्गासह मंदिर परिसरातील व्यवस्था तपासल्या. गर्दीच्या काळात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा व्यवस्था आणि रांगेतील नियोजनावर विशेष भर देण्याचे आदेश त्यांनी दिले.

​"शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून मंदिर संस्थानच्या अधिकाऱ्यांशी संवाद आणि पाहणी."

​वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक
पाहणीनंतर जिल्हाधिकारी पुजार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. सुरक्षा, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, अग्निशमन आणि आपत्कालीन आरोग्य सेवांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडून भाविकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा पुरवाव्यात, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

​या पाहणी आणि बैठकीस पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, मंदिर व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक चोरमले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments