Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सीमेवरील रक्षकाचा शिवारकऱ्यांकडून अनोखा सन्मान!​तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे १७ वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर परतलेल्या जवान लक्ष्मण फंड यांचे सजवलेल्या बैलगाडीतून भव्य स्वागत


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
एक सीमेवर अहोरात्र खडा पहारा देऊन देशाच्या सीमांचे रक्षण करतो, तर दुसरा शिवारात घाम गाळून संपूर्ण देशाची भूक भागवतो. ‘जय जवान, जय किसान’ या अजरामर घोषणेची आणि या दोन मजबूत आधारस्तंभांमधील अतूट, भावबंधांची जिवंत प्रचिती नुकतीच तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे पाहायला मिळाली. तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ आणि खडतर देशसेवेनंतर मायभूमीत सुखरूप परतलेले गावचे सुपुत्र जवान लक्ष्मण महादेव फंड यांचे ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहात, भावनिक वातावरणात आणि अभूतपूर्व दिमाखात स्वागत केले.

​पांगरदरवाडीच्या मातीत जन्मलेल्या लक्ष्मण फंड यांनी १७ वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावून निवृत्तीनंतर आपल्या जन्मभूमीत पाऊल ठेवले. या ऐतिहासिक आणि अभिमानाच्या क्षणाचे औचित्य साधून संपूर्ण गाव एकत्र आले होते. निसर्गाची अवकृपा आणि दुष्काळाचे सावट असतानाही, बळीराजाने आपल्या सर्व अडचणी बाजूला ठेवून या वीर जवानाच्या स्वागतात कोणतीही उणीव भासू दिली नाही. गावातील शेतकरी बांधव दत्तात्रय खंडागळे यांनी अत्यंत आदराने व उत्साहाने आपली बैलगाडी आकर्षकरीत्या सजवून जवानाच्या मिरवणुकीसाठी उपलब्ध करून दिली. सजवलेल्या बैलगाडीत बसवून जवानाची काढण्यात आलेली ही भव्य मिरवणूक केवळ एका सैनिकाचा सत्कार नव्हती, तर 'जवान आणि किसान' यांच्यातील अथांग आपुलकीचे व एकात्मतेचे दर्शन घडवणारा सुवर्णक्षण ठरला.

​विद्यार्थ्यांनी घेतला शिस्त आणि देशभक्तीचा धडा
या सोहळ्यादरम्यान गावातील शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती. मायभूमीत परतलेल्या जवानावर पुष्पवृष्टी करत आणि भारतमातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रसंगी जवानाशी संवाद साधत देशसेवा, शिस्त, त्याग आणि कठोर कर्तव्यनिष्ठेचे धडे घेतले. आपल्या गावचा जवान सुखरूप घरी परतल्याबद्दल ग्रामस्थांनी ग्रामदैवताचे आभार मानत आनंदोत्सव साजरा केला.

​सध्याच्या काळात जिथे वैयक्तिक स्वार्थाला प्राधान्य दिले जाते, तिथे सामाजिक बांधिलकी जपत स्वतःहून बैलगाडी सजवून आणणारे दत्तात्रय खंडागळे यांच्या दातृत्वाचे आणि ग्रामस्थांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सीमेवर लढणारा जवान आणि शेतात राबणारा शेतकरी यांच्या त्यागामुळेच हा देश महान बनला असून, या अभूतपूर्व स्वागताने पांगरदरवाडीच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहिले गेले आहे.

Post a Comment

0 Comments