Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिक्षक पदोन्नती घोळ व शाळा एकत्रीकरणाविरुद्ध सीमाताई माडजे-रोचकरी आक्रमक; आंदोलक शिक्षकांना भक्कम पाठिंबा! शिक्षकांच्या आक्षेपांना बळ अन् सीमाताईंच्या रणशिंगामुळे जि. प. प्रशासनाची माघार; ३ जुलैच्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर पुढील निर्णयापर्यंत स्थगिती

            --जिल्हा परिषद सदस्या सीमाताई माडजे-रोचकरी 
धाराशिव |  Only न्युज धाराशिव वृत्तसेवा 
धाराशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ३ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता, नियमबाह्य कारभार आणि आर्थिक देवाणघेवाणीच्या गंभीर आरोपांवरून पेटलेल्या वादात आता मंगरूळ गटातील जि. प. सदस्या सौ. सीमाताई माडजे-रोचकरी यांनी उडी घेतली आहे. पदोन्नतीतील अन्यायकारक अटी आणि शाळा एकत्रीकरणाच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला सीमाताईंनी जाहीर व भक्कम पाठिंबा दर्शवला असून, जि. प. सभेत शिक्षकांची बाजू पोटतिडकीने मांडत प्रशासकीय मनमानीला पुरते उघडे पाडले आहे. सीमाताईंच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि शिक्षकांच्या आक्षेपांच्या तीव्रतेमुळे अखेर प्रशासनाला ३ जुलैच्या पदोन्नती प्रक्रियेला पुढील निर्णयापर्यंत स्थगिती देणे भाग पडले आहे.

.                                ( --प्रतिकात्मक फोटो)

शिक्षकांच्या लढ्याला सीमाताईंचे बळ; प्रशासकीय अनियमिततेवर थेट प्रहार
शिक्षकांच्या विविध संघटनांनी व बाधित शिक्षकांनी पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे सांगत आक्षेप नोंदवले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत सीमाताई माडजे-रोचकरी यांनी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.

सभागृहात शिक्षकांची बाजू मांडताना सीमाताई म्हणाल्या की, "शिक्षण विभागाने प्रचलित शासन निर्णय व सर्वसामान्य नियमांना पायदळी तुडवून घाईघाईने ही पदोन्नती प्रक्रिया उरकली आहे. यात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कामे झाली असून आर्थिक देवाणघेवाणीचेही गंभीर आरोप आहेत. आक्षेप नोंदवण्यास पुरेसा वेळ न देणे आणि दिव्यांगांच्या हक्कावर गदा आणणे हा नैसर्गिक न्यायाचा थेट खून आहे. अन्यायग्रस्त शिक्षकांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी असून हा बेकायदेशीर घाट अजिबात सहन केला जाणार नाही."

शाळा एकत्रीकरणाच्या धोरणालाही तीव्र विरोध
केवळ पदोन्नती घोळच नव्हे, तर ग्रामीण भागातील शाळा एकत्रीकरणाच्या निर्णयाविरोधातही सीमाताईंनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून चाललेले शाळांचे एकत्रीकरण तात्काळ थांबवण्यात यावे आणि या धोरणामुळे बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आलेल्या पोषण आहार मदतनीस महिलांना न्याय मिळावा, अशी आग्रही मागणी त्यांनी या वेळी पुनरुच्चारित केली. शिक्षकांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला तात्काळ सुधारणा करण्याचे आव्हान दिले.

अखेर ३ जुलैच्या पदोन्नतीला स्थगिती; शासनाकडून मागवणार मार्गदर्शन
सीमाताई माडजे-रोचकरी यांनी मांडलेली आक्रमक भूमिका आणि शिक्षक संघटनांनी उपस्थित केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी या प्रकरणी नरमाईची भूमिका घेतली. प्राप्त तक्रारींमध्ये व आक्षेपांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे दिसून आल्याने, न्यायालयीन वाद किंवा कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी ३ जुलै रोजी राबवण्यात आलेली प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया अखेर पुढील निर्णयापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार सदर पदोन्नती प्रक्रिया पुन्हा नव्याने पार पाडण्याबाबत राज्य सरकारकडून तातडीने आवश्यक ते मार्गदर्शन मागविण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. राज्य शासनाकडून स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जि. प. अध्यक्षांनी दिली.

सीमाताई माडजे-रोचकरी यांनी शिक्षकांच्या आंदोलनाला दिलेला भक्कम पाठिंबा आणि सभागृहात दिलेला लढा यामुळे अन्यायग्रस्त शिक्षकांमध्ये नव्या आशेचा किरण पसरला आहे. सीमाताईंच्या या आक्रमक पावित्र्यामुळे शिक्षण वर्तुळातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments