Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

लोहाऱ्याच्या लेकीची चंदेरी दुनियेत 'उंच भरारी'; संघर्षातून साकारली अभिनेत्री अनिता मोरेंची यशोगाथा! 'पिक्चर बॉईज' १५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला| १८ मालिका,१५ चित्रपटांनंतर आता हिंदी सिनेमातही दिसणार ठसा

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एखादी व्यक्ती शून्यातून विश्व कसं निर्माण करू शकते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा गावची कन्या अनिता राम मोरे. अभिनयाचा कोणताही वारसा नसताना, केवळ स्वप्नांच्या ध्यासापायी अनिता यांनी लोहारा ते चंदेरी दुनियेपर्यंतचा जो प्रवास केला आहे, तो थक्क करणारा आहे. आजवर अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांनंतर आता १५ मे रोजी त्यांचा 'पिक्चर बॉईज' हा नवा चित्रपट महाराष्ट्रभर धूमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

संघर्षातून गवसली यशाची गवसणी
अनिता मोरेंचा अभिनय प्रवास गुलाबाच्या फुलांसारखा मऊ नव्हता. एका छोट्या ग्रामीण भागातून येताना घराचा विरोध आणि लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या अशा अनेक अडथळ्यांनी त्यांच्या वाटा अडवल्या होत्या. दहावीत असताना 'मैने प्यार किया' चित्रपटातील भाग्यश्री यांचा अभिनय पाहून अभिनयाचे बीज मनात रुजले होते. मात्र, परिस्थितीमुळे काही काळ या स्वप्नांना विराम मिळाला. २०१३ मध्ये पतीच्या नोकरीनिमित्त उस्मानाबादला असताना अभिनयाची पहिली संधी चालून आली होती, मात्र ती तेव्हा स्वीकारता आली नाही.

पुण्यात मिळाले स्वप्नांना पंख
मुलीच्या शिक्षणासाठी पुण्यात स्थलांतरित झाल्यानंतर अनिता यांच्या आयुष्याला खरे वळण मिळाले. बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्येष्ठ अभिनेत्री सीमा कुलकर्णी यांची भेट झाली आणि तिथून त्यांच्या खऱ्या अभिनय प्रवासाचा श्रीगणेशा झाला. त्यांनी केवळ अभिनयच केला नाही, तर शिवाजी लोटन पाटील, योगेश देशपांडे आणि प्रियदर्शन जाधव यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.

यशाचा आलेख: मालिका ते चित्रपट
अनिता मोरे यांनी आतापर्यंत १८ हून अधिक मराठी मालिका आणि १५ पेक्षा जास्त मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या 'स्टार प्रवाह' वरील 'आनंदी' या मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून, प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले आहे. मालिकांसोबतच त्यांची पावले आता हिंदी चित्रपटसृष्टीकडेही वळली असून, आगामी काही हिंदी प्रोजेक्ट्सची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.

प्रमुख मालिकांमधून घराघरात पोहोचलेला चेहरा
अनिता मोरे यांनी आजवर १८ हून अधिक मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. यामध्ये प्रामुख्याने 
बाळुमामाच्या नावानं चांगभलं (कलर्स मराठी)
स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा (स्टार प्रवाह)
सहकुटुंब सहपरिवार (स्टार प्रवाह)
सोन्याची पावलं (सोनी मराठी)
ज्ञानेश्वर माऊली (सोनी मराठी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (स्टार प्रवाह)
यांसारख्या दर्जेदार मालिकांमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. सध्या 'आनंदी' मालिकेतील त्यांच्या कामाचेही विशेष कौतुक होत आहे.

चित्रपट आणि वेब सिरीजमधील दमदार कामगिरी
अनिता यांनी १५ हून अधिक मराठी चित्रपटांत काम केले असून, त्यातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले आहेत. त्यांनी दिग्दर्शक पुंडलिक लक्ष्मण धुमाळ, रणजीत जाधव, प्रदीप टोणगे, योगेश देशपांडे आणि शिवाजी लोटन पाटील अशा दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.
गाजलेले चित्रपट:
१) पेन्शन (अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोबत)
२) ६६ सदाशिव (प्रवीण तरडे यांच्यासोबत महत्त्वाचा सीन)
३) कां रं देवा (अभिनेते अरुण नलावडे यांच्यासोबत)
४) सरकार मान्य
५) कलवरी
६) कारवाई एक काफिला (हिंदी चित्रपट)

तसेच, 'भुतातटेला' (प्रियदर्शन जाधव यांच्यासोबत 'आई'ची भूमिका) आणि 'बाशिंग' यांसारख्या वेब सिरीजमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

लघुपटांसाठी (Short Films) राष्ट्रीय सन्मान
केवळ मालिका किंवा चित्रपटच नव्हे, तर लघुपटांच्या क्षेत्रातही अनिता मोरेंनी यश मिळवले आहे. त्यांच्या 'गाजर' या शॉर्ट फिल्मला 'बेस्ट फिल्म अवॉर्ड' मिळाले असून, 'सबक: हम सब एक है' या फिल्ममधील त्यांच्या भूमिकेचेही मोठे कौतुक झाले. हे सर्व काम सोशल मीडिया आणि यूट्यूबवर उपलब्ध असून रसिक प्रेक्षकांकडून त्यास भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

१५ मे रोजी 'पिक्चर बॉईज'ची प्रतीक्षा
निलेशसिंह राजपूत दिग्दर्शित आणि रवी पांडुरंग पंडितपवार निर्मित 'पिक्चर बॉईज' या चित्रपटात अनिता मोरे एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. शिवाजी केशव पाटील हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अनिता मोरेंच्या अभिनयाची आणखी एक नवी छटा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

ग्रामीण भागातील मुलींसाठी ठरल्या प्रेरणास्थान
ग्रामीण भागात संधी आणि मार्गदर्शनाचा अभाव असतानाही अनिता मोरे यांनी गाठलेले हे शिखर कौतुकास्पद आहे. लोहारा गावच्या मातीतील या गुणी कलाकाराने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments