धाराशिव: येथील बैठकीत शासनाच्या धोरणाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या आणि आपल्या हक्कांसाठी एकत्र आलेल्या सुपरवायजर (गटप्रवर्तक)
'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
धाराशिव | प्रतिनिधी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) गत १७ ते १८ वर्षांपासून गावपातळीवर आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणून अहोरात्र काम करणाऱ्या गटप्रवर्तक (आशा सुपरवायजर) वर्गात शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र असंतोष खदखदत आहे. नुकत्याच काढण्यात आलेल्या ३० जूनच्या शासन निर्णयात १० वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय समायोजनाचा निर्णय घेण्यात आला असला, तरी या प्रक्रियेतून तब्बल दोन दशकांपासून सेवेत असलेल्या गटप्रवर्तकांना जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर धाराशिव येथे झालेल्या राज्यभरातील गटप्रवर्तकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत शासनाच्या या दुजाभवावर जोरदार आक्षेप घेण्यात आला असून, आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
आरोग्य यंत्रणेचा कणा, मात्र प्रशासकीय अनास्था
ग्रामीण भागाच्या आरोग्य व्यवस्थेत गटप्रवर्तक हा अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा दुवा मानला जातो. एकाच गटप्रवर्तकावर सरासरी २० ते २५ गावांची प्रचंड जबाबदारी असते. यादरम्यान महिन्याला किमान २० ते २५ गाव भेटी देणे, आरोग्यविषयक नियमित बैठका घेणे, माता संगोपन मोहिमा राबवणे, गुंतागुंतीचे अहवाल तयार करणे तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी आरोग्य योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे प्रचंड काम हे घटक अहोरात्र करत आहेत. मात्र, गेली १७ ते १८ वर्षे जिद्दीने आणि निष्ठेने सेवा देऊनही शासनाकडून त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाची योग्य दखल घेतली जात नसल्याने ३५00 हून अधिक गटप्रवर्तकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
बैठकीत उमटले आक्रमक स्वर
धाराशिव येथे मंगळवारी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये शासनाच्या ३0 जून २०२६ च्या शासन निर्णयाचे स्वागत करण्यात आले, परंतु त्याच धर्तीवर गेली दीड-दोन दशके सेवा देणाऱ्या गटप्रवर्तकांनाही या निर्णयाच्या कक्षेत तातडीने सामावून घेण्यात यावे, अशी आक्रमक मागणी रेटण्यात आली. जिल्हाभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी शासनाने या प्रकरणी तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही भूमिका घेतली.
या जिल्हास्तरीय बैठकीस प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, राज्य संघटक दत्ता देशमुख, सुपरवायजर (गटप्रवर्तक) व आशा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई गुंजकर-कदम, जिल्हा संघटक सुरेखा ठाकुर, जिल्हा संघटक नवनाथ धुमाळ, अश्विनी धनके, राजश्री साळुंके, अनिता पाटील, कविता धनके, संगीता डोलारे, प्रियंका मडके, नम्रता सोमवंशी, गंगु रक्ते, उषा गायकवाड, शाहीन शेख यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील सर्व आक्रमक गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार, आमदार व मंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष; रेखाताई गुंजकर-कदम यांचा परखड सवाल
शासनाच्या नव्या धोरणावर तीव्र प्रतिक्रिया देताना सुपरवायजर व आशा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई गुंजकर-कदम यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली; "१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या एनएचएम कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, त्याचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, नेमक्या याच आरोग्य यंत्रणेचा गेली १७ ते १८ वर्षांपासून कणा असलेल्या गटप्रवर्तकांच्या दीर्घकालीन आणि निष्ठावान सेवेकडे शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे अन्यायकारक आहे. शासनाने या प्रकरणी कोणतीही दिरंगाई न करता अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून तातडीने विचार करावा आणि गटप्रवर्तकांना न्याय द्यावा," अशी आक्रमक व भारदस्त प्रतिक्रिया रेखाताई गुंजकर-कदम यांनी या बैठकीत दिली.
0 Comments