सावरगाव येथील नागोबा यात्रेत नागपंचमीच्या दिवशी मुख्य पुजारी सद्गुरू स्वामी यांच्या नेतृत्वात वाजत-गाजत निघालेली पारंपरिक 'गण' व पालखी मिरवणूक.
'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या, तसेच ऐतिहासिक व धार्मिक परंपरा लाभलेल्या तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध नागोबा यात्रेची सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सांगता झाली. आषाढ अमावस्येपासून सुरू झालेल्या या पाच दिवसीय सोहळ्यात निसर्गाचा चमत्कार घडवत एकमेकांचे कट्टर वैरी मानले जाणारे साप, पाल आणि विंचू हे तिन्ही प्राणी सलग पाच दिवस एकाच दगडी शिळेखाली एकत्र राहिल्याचा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांतून भाविकांचा प्रचंड जनसागर लोटला होता.
एकमेकांचे कट्टर वैरी मानले जाणारे साप, पाल आणि विंचू एकाच दगडी शिळेखाली एकत्र आल्याचा अद्भुत सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी सावरगाव मंदिरात लोटलेला भाविकांचा जनसागर.
नागपंचमीला धार्मिक विधींचा उत्साह
सोमवारी नागपंचमीच्या दिवशी पहाटेपासूनच नागोबाच्या मूर्तीस अभिषेक घालण्यासाठी व नवस फेडण्यासाठी भाविकांनी मंदिरात लांबच लांब रांगा लावल्या होत्या. सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने पूजा करत नागोबाला लाह्या, दूध आणि पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला. भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करत सुमारे २० ते २५ हजार महिलांनी नागनाथ मंदिरासमोरील वारुळाचे पूजन केले. बहिणींनी भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक म्हणून पांढरा धागा बांधून आपला उपवास सोडला.
मुख्य पुजारीपदाच्या दाव्यातून यंदा सावरगावच्या नागोबा यात्रेत प्रथमच निघालेली माजी पुजारी कल्याण स्वामी यांच्या समर्थकांची स्वतंत्र 'गण' मिरवणूक.
पुजाऱ्यांच्या वादातून २०० वर्षांची परंपरा खंडित!
यंदाच्या नागोबा यात्रेत एक वादग्रस्त घडामोडीची नोंद झाली. मंदिराचा मुख्य पुजारी मीच असल्याचा दावा दोन्ही पुजाऱ्यांनी केल्याने, यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन स्वतंत्र 'गण' मिरवणुका काढण्यात आल्या.
दुपारी ३:३० वाजता पुजारी सद्गुरू स्वामी यांची गण व पालखी मिरवणूक निघाली. त्यानंतर, यापूर्वी मंदिरात पुजारी राहिलेले कल्याण स्वामी यांनीही मुख्य पुजाऱ्याचा हक्क सांगत आपल्या गणाची दुसरी स्वतंत्र मिरवणूक काढली. दोन्ही पुजाऱ्यांमध्ये 'मुख्य पुजारी' पदावरून रंगलेल्या या वादामुळे सावरगाव यात्रेतील तब्बल २०० वर्षांपासून चालत आलेली एकाच गणाची अखंड परंपरा खंडित झाली. या अभूतपूर्व प्रकारामुळे उपस्थित भाविक व ग्रामस्थांमध्ये या वादाचीच जोरदार चर्चा रंगली होती.
'हर हर महादेव'च्या जयघोषात निघाली पालखी
गण आणि पालखी मिरवणूक टाळ-मृदंग, दिमडीचा निनाद, नागनाथाचा जयघोष आणि छत्री-निशाणांच्या लवाजम्यासह मारुती मंदिराकडे रवाना झाली. मिरवणूक मार्गावर प्रत्येक घरासमोर सुवासिनींनी आकर्षक रांगोळ्या काढून व पाट टाकून पालखीचे पूजन केले.
हनुमान मंदिरात धार्मिक संचार झाल्यानंतर मिरवणूक पुन्हा नागनाथ मंदिराकडे परतली. मंदिरात खरगाचे मानकरी संजय कोळी यांनी मुख्य पुजारी सद्गुरू स्वामी यांना स्नान (खरगा विधी) घातले. सायंकाळी ५:३० वाजता मंदिरासमोर टाळ-मृदंगाच्या गजरात भव्य महाआरती करण्यात आली.
वर्षभरातील पावसाचे अन् पिकांचे भाकीत (भाकणूक)
महाआरतीनंतर मंदिराशेजारील ओट्यावर यात्रेतील मुख्य आकर्षण असलेला 'भाकणूक' (भविष्यवाणी) कार्यक्रम पार पडला. पुजारी सद्गुरू स्वामी यांनी यंदाच्या वर्षातील कृषी व पर्जन्यमानाबाबतचे भाकीत वर्तवले.
"यंदाच्या वर्षात ज्वारी आणि भुईमूग ही पिके अत्यंत जोरदार आणि विपुल प्रमाणात येतील; तर पावसाचे प्रमाण जेमतेम राहील," असे भाकीत सद्गुरू स्वामी यांनी वर्तवले. हे भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी मंदिर परिसरात हजेरी लावली होती.
सर्वधर्मसमभावाचे अन् निसर्गाचे अनोखे प्रतीक
आजच्या आधुनिक काळात सावरगावची ही नागोबा यात्रा केवळ धार्मिक श्रद्धा नसून, निसर्ग आणि प्राण्यांच्या सहअस्तित्वाचे तसेच सर्वधर्मसमभावाचे एक अनोखे प्रतीक बनली आहे. यात्रेच्या पाच दिवसांत मंदिर परिसर पेढा-मिठाईची दुकाने, खेळणी, पाळणे आणि भक्तगणांच्या गर्दीने गजबजला होता.
नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर सावरगाव येथील मुख्य मंदिरात श्री नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी पहाटेपासूनच लागलेल्या भाविकांच्या लांबच लांब रांगा.
ग्रामपंचायत व प्रशासनाचे नियोजनबद्ध आयोजन
सुरक्षा व सोयी-सुविधांचा नेटका ताळमेळ:
सुशोभीकरण: यात्रेनिमित्त सावरगाव व परिसर भव्य स्वागत कमानी आणि डिजीटल बॅनरने सजला होता.
ग्रामपंचायत उपक्रम: भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि दर्शनाची सुलभ व्यवस्था करण्यासाठी सरपंच सुवर्णाताई पाटील, उपसरपंच स्वातीताई तोडकरी, भाजप तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माजी जि. प. सदस्य राजकुमार पाटील, माजी सरपंच रामेश्वर तोडकरी आणि माजी उपसरपंच आनंद बोबडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रशासन व आरोग्य: तामलवाडी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर आरोग्य विभागातर्फे भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर चालवण्यात आले.
भजनी मंडळ: यात्रा यशस्वी करण्यासाठी नागनाथ भजनी मंडळ व समस्त सावरगाव ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
0 Comments