मुंबई:मुंबईतील ‘नंदनवन’ निवासस्थानी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतिक रोचकरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई | धाराशिव : 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
धाराशिव जिल्ह्याच्या आणि विशेषतः तुळजापूरच्या राजकारणात मंगळवारी रात्री एक मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या खंबीर नेतृत्वावर आणि मार्गदर्शनावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रतिक (बप्पा)रोचकरी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मुंबई येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी रात्री ८ वाजता अत्यंत उत्साहात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक रोचकरी यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो जिल्हाध्यक्ष प्रतिक रोचकरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी उपस्थित खासदार ओमराजेंचे खंदे समर्थक, लोकप्रतिनिधी व शिवसेना कार्यकर्ते.
खासदार ओमराजे निंबाळकरांचे समर्थक व प्रमुख पदाधिकारी उपस्थित
पक्षप्रवेशाच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत त्यांचे खंदे समर्थक व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी विशेष रुपाने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित असलेले खासदार ओमराजेंचे प्रमुख समर्थकांमध्ये प्रामुख्याने
युवा नेते ऋषी भैया मगर,गोपाळ सुरवसे – जिल्हा परिषद सदस्य (जि. प. सदस्य),सुजित हंगरगेकर– सरपंच (काटी),गौरीशंकर कोडगिरे – सरपंच, वडगाव (काटी) यांच्यासह तुळजापूर व धाराशिव परिसरातील असंख्य शिवसेना कार्यकर्ते व रोचकरी यांचे समर्थक या सोहळ्याला उपस्थित होते.
‘शब्द’ न पाळल्यामुळे आमदार राणा पाटील यांच्या गोटाला धक्का!
प्रतिक रोचकरी यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक राहिला आहे. सुरुवातीला शिवसेना युवासेनेत सक्रिय असणाऱ्या रोचकरी यांनी २०२४ मध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.
मात्र, भाजपमध्ये प्रवेश करताना आणि पक्षसंघटनेत काम करताना दिलेला ‘शब्द’ भाजप नेतृत्वाकडून पाळला गेला नाही, अशी तीव्र नाराजी रोचकरी व त्यांच्या समर्थकांमध्ये होती. अपेक्षेप्रमाणे निर्णय न झाल्याने आणि पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे नाराज झालेल्या रोचकरी यांनी अखेर आमदार राणा पाटलांच्या गोटातून बाहेर पडत थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी हातमिळवणी केली. त्यामुळे हा पक्षप्रवेश म्हणजे ‘दिलेला शब्द विरुद्ध राजकीय वास्तव’ या संघर्षातून झालेला मोठा राजकीय दणका मानला जात आहे.
तुळजापुरात नवी राजकीय समीकरणे
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेशामुळे धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षच फुटल्यामुळे भाजपला विशेषतः राणा पाटील गटाला मोठा राजकीय फटका बसला आहे.
प्रतिक बप्पा रोचकरी यांची रोखठोक प्रतिक्रिया
"खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सक्षम नेतृत्वावर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख विकासाच्या कामावर विश्वास ठेवून मी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी शिवसेनेच्या माध्यमातून रात्रंदिवस काम करेन. तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी, निष्ठावंत कार्यकर्त्यांना सन्मान देण्यासाठी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेना हेच खरे व्यासपीठ असून भूतकाळात काय झाले यापेक्षा भविष्यात खासदार ओमराजेंनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याचे मी नक्कीच सोने करेन.तसेच यापुढील काळात धाराशिव जिल्हा आणि तुळजापूर तालुक्यात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी व संघटन तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे."
-'Only न्यूज धाराशिव' डिजिटल डेस्क.
0 Comments