"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तळमळीच्या प्रशासकीय प्रयत्नांतून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी महसूल व वन विभागाच्या वतीने सावरगाव (ता. तुळजापूर) येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' बुधवारी (दि. ६) अत्यंत उत्साहात संपन्न झाले. सकाळी १० ते दुपारी ३.३० या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात संजय गांधी निराधार योजना, ७/१२ वाटप आणि विविध दाखल्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महसूल व विविध विभागांचा सहभाग
शिबिरामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग, संजय गांधी विभाग, पुरवठा विभाग, सहकार विभाग, आधार केंद्र, पशुवैद्यकीय विभाग, महिला व बालविकास विभाग, तसेच भूमी अभिलेख आणि सीएससी डिजिटल पेमेंट विभाग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात ७/१२ फेरफार दुरुस्ती, डिजिटल ७/१२ चे महत्त्व, ई-मोजणी आणि संजय गांधी निराधार योजनेच्या मंजुरी आदेशांचे वाटप करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख, पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोषदादा बोबडे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई भाले, माजी जि.प. सदस्य राजकुमार पाटील, दहिवडीचे सरपंच प्रशांत गाटे आणि सावरगावचे माजी सरपंच रामेश्वर आबा तोडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी बाळासाहेब जगताप व अण्णासाहेब यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावरगाव मंडळातील ग्राम महसूल अधिकारी मुकुंद शिंदे, सागर शिंदे, अजिंक्य आवाड, मयुरी अंदाने आणि प्रशांत गुळवे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांना स्नेह भोजन दिले.
शिबिरातील महत्त्वाच्या सेवा व मार्गदर्शन
७/१२ व ८ अ चे वाटप.
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वितरण.
डिजिटल ७/१२ डाउनलोड करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन व जनजागृती.
शेतजमीन वाटप, ई-मोजणी आणि विविध प्रमाणपत्रांचे
वाटप एकाच छताखाली.
"शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी प्रशासन आता थेट गावांपर्यंत पोहोचत आहे. 'महाराजस्व समाधान शिबिर' हा उपक्रम नागरिकांच्या समस्या निवारणासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, याद्वारे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित महसूल समस्यांचा तात्काळ निपटारा करण्यात आला आहे. डिजिटल ७/१२ चा वापर आणि इतर महसूल सुविधांचा लोकांनी लाभ घ्यावा, यासाठी प्रशासन नेहमी कटिबद्ध आहे."
— अरविंद बोळंगे, तहसीलदार, तुळजापूर
"आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी व महसूल विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे. 'ई-पीक पाहणी' आणि विविध कृषी योजनांच्या लाभाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी या सुविधांचा पुरेपूर लाभ घ्यावा."
— आबासाहेब देशमुख, तालुका कृषी अधिकारी
0 Comments