काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील जागृत देवस्थान तथा ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यांच्या यात्रेला आषाढ अमावस्या ते श्रावण नागपंचमी या दरम्यान सुरू होणाऱ्या यात्रेला रविवार दि.4 ऑगस्ट रोजी सकाळी श्री नागनाथ महाराज यांच्या मुर्तीला रुद्राभिषेक, पंचआरती व भजन गायनाच्या कार्यक्रमाने कंकन बांधून उत्साहात प्रारंभ झाला.
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध श्री नागोबा यात्रेस गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. आषाढी अमावस्या रविवारी आल्याने या यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेले नाग, पाल, विंचू एकत्रित आले आहेत. विशेष म्हणजे यंदा दोन नाग, पाल व विंचू एकत्र आले आहेत. तसेच यंदा मंदीरात दरवर्षी असणारे मल्लिकार्जुन खरगे महाराज यांच्या ऐवजी त्यांचे अधिकारत्व नुतन खर्गे महाराज सद्गुरू गुरुनाथ स्वामी यांचेकडे आले आहे. नागनाथ देवस्थान पुजारी/खर्डे महाराज अधिकारत्व सोहळा नुकताच 22 जुलै ते 25 जुलै या कालावधीत श्री ष.ब्र. 108 श्रीगुरु विरूपाक्ष शिवाचार्य गुरु गुरुगिरी शिवाचार्य मानुरकर महाराज यांच्या गुरुत्वात 108 प्रभूदेव शिवाचार्य माढेकर महाराज यांच्या साक्षत्वाने व उपस्थितीने संपन्न झाला.
एकमेकांचे शत्रू समजले जाणारे नाग,पाल,विंचू हे नागोबा यात्रेत एकत्रित येत असल्याचे दृश्य प्रतीवर्षी पहावयास मिळते़. त्यांचा मुक्काम पाच दिवस मंदिरासमोर असेल, नागोबा देवस्थानचे यंदा मुख्य पुजारी नुतन खर्गे महाराज सद्गुरू गुरुनाथ स्वामी असणार आहेत. सावरगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या या नागोबा यात्रेला राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक येथे दर्शनासाठी येतात.
आजच्या काळात या यात्रेकडे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून भाविकांमधून पाहिले जाते. नाग, पाल, व विंचू हे उभयचर एकमेकांचे कट्टर हाडवैरी समजले जाणारे मुके प्राणी आषाढ अमावस्या ते श्रावण नागपंचमी असे पाच दिवस एकत्र येतात. तर समाजातील लोकांनी सुध्दा एकत्रित येण्याचा संदेश देणारी ही यात्रा असल्याचे या यात्रेला दरवर्षी येणारे भाविक आवर्जून सांगतात.
नागपंचमीला येथे विविध प्रथा
येथे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येकांच्या घरोघरी प्रथा वेगवेगळ्या असतात. या दिवशी अनेकांच्या घरी भाजी चिरण्यासाठी विळी तसेच,पोळी भाजण्यासाठी तव्याचा उपयोग केला जात नाही. काही घरांत प्रत्येकाने नदीवर जाऊन आंघोळ करण्याची पद्धत आहे. परंपरेनुसार ज्या प्रथा रुढ झाल्या आहेत, त्या आजही कायम आहेत. आजच्या धावत्या युगातही ग्रामीण भागावर रुढी, परंपरांचा पगडा कायम आहे. हेच या ग्रामीण भागातील ग्रामदैवतांच्या माध्यमातून दिसून येते. आषाढी अमावस्या ते श्रावण नागपंचमी दरम्यान होणाऱ्या या यात्रेसाठी हजारो भक्तगण याठिकाणी आजही दर्शनासाठी येतात.
पन्नास वर्षापासून डोके कुटुंबाची अविरत सेवा
लिंबाऱ्याच्या पाल्यापासून गोलाकार माळा बनविण्याचे काम हरीदास विश्वनाथ डोके यांचे कुटुंबीय मागील पन्नास वर्षापासून विनामूल्य करीत असून ते कार्य आजतागायत सुरु आहे. डोके कुटुंबियांकडून लिंबाऱ्याच्या माळा बनविण्याचे काम सुरु आहे.या तयार केलेल्या माळा नागपंचमीदिवशी गण मिरवणुकीत भाविकांना वाटण्यात येतात. ही लिंबाऱ्याची माळ वर्षभर घरात अडकवतात त्यामुळे घरात सापांचा वावर होत नाही, अशी आख्यायिका आहे.
पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत सज्ज यंदा ही यात्रा 4 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या यात्रेसाठी येथील ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासन सज्ज झाले असून परिसरातून येणाऱ्या वाहनांची स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून यंदा होणाऱ्या संभाव्य यात्रेतील गर्दीच्या पार्श्वभूमीवर येथील भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा)बोबडे, माजी सरपंच रामेश्वर (आबा) तोडकरी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार (भाऊ)पाटील, आनंद (मालक) बोबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेऊन नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच या यात्रेच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
0 Comments