काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे दिनांक 8 रोजी सकाळी विजय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शारदा नवरात्र उत्सवानिमित्त राजेंद्र अनवते यांनी संग्रहित केलेल्या शिवकालीन युगंधर शस्त्र संग्रहाचे प्रदर्शन सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भरविण्यात आले.
आज काल प्रत्येक जण स्वप्रगतीच्या आणि पैशाच्या भौतिक सुखाच्यामागे धावत असतो तर अनेकांना काही ना काही वेगळे करण्याचा छंद असतो. काहींना जुने कात्रणे, काही ना जुने फोटो, तर काहीना विशेष असे संग्रही ठेवण्याचा छंद असतो. नोट असो की नाणं,ते चंलनातून बाद झाले की,पुन्हा मिळणे अवघड होते.परंतु अलीकडील या स्थितीवर कडी करित शिवराई नाणी, ब्रिटिश कालीन नाणी,स्वातंत्र्योत्तर नाणी व शस्त्रे आजही आपला खणखणीतपणा सिध्द करतायेत. इतिहासप्रेमीसाठी मानाचं पान मिळवित ही नाणी व शस्त्रे शिवकालीन वैभवाचे दर्शन घडवित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्मिळ नाणी, ब्रिटिश कालीन नाणी, स्वातंत्र्योत्तर नाणी जमा करण्याबरोबरच शिवकालीन शस्त्रास्त्रे जमा करण्याचा छंद जोपासत आहेत पंढरपूर तालुक्यातील करकंब या गावातील राजेंद्र हरिदास अनवते असे या अवलियाचे नाव असून त्यांचेकडे शिवकालीन शस्त्रासह शिवराई आणि होण या दोन्ही प्रकारची नाणी आहेत. होण अतिदुर्मिळ असून त्याची प्रतिकृती त्यांचेकडे आहे.राजेंद्र अनवते हा इतिहासाने भारावलेला कट्टर छत्रपतींचा मावळा आहे.
काटी येथील विजय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शारदा नवरात्र उत्सवानिमित्त इतिहासप्रेमीसाठी व नागरिकांना शिवकालीन शस्त्रास्त्रांची व शिवकालीन नाण्यांची माहीती व्हावी या उद्देशाने अनवते यांच्या युगंधर शस्त्र संग्रहातील "शिवकालीन शस्त्र प्रदर्शना"चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात शिवकालीन तलवार,तलवार मुठ,नायर तलवार,मराठा धोप तलवार, सुवर्ण जडीत तलवार,विळा, तबर (कुऱ्हाडी), दांडपट्टा,गुप्ती, जांबिया,खंजिर, वाघनख्या, चिलखत, शिरस्थान, कट्यार, विजय नगर कट्यार, अडकिते, तोफगोळा,दस्तान,गुर्ज,अंकुश जुल्फी, ऐतिहासिक नाणी, शिवपूर्वकालीन नाणी, ब्रिटिश कालीन नाणी, स्वातंत्र्योत्तर नाणी, भीमथडी घोडा, शेरमापे, दिवे, घोड्याचे नाल, छुपे शस्त्रे,कत्ती तलवार, पट्टीसा तलवार, पाणपुडा,सोसन पत्ता,गुर्ज, राजपूत तलवार, सुवर्ण जडीत वक्र धोप तलवार,शिकारीचे भाले,बिछवा,ढाल, खंजीर अशा विविध वस्तू या प्रदर्शनात मांडून त्याची माहिती संग्राहक राजेंद्र अनवते यांनी विद्यार्थी व नागरिकांना दिली. या दुर्मिळ वस्तू पाहण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांनी गर्दी केली होती.
युगंधर शस्त्र संग्रहातील वस्तूंची पाहणी करताना नागरिक....
प्रदर्शनातील नाण्याविषयी अनवते यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी स्वतंत्र नाण्याची निर्मिती केली होती. तांब्याच्या धातूपासून बनवलेली ही नाणी शिवराई म्हणून ओळखली जातात. ही नाणी एकोणिसाव्या शतकापर्यंत चलनात होती. अर्धी,पाव, व पुर्ण असे शिवराईचे मुल्य होते.याखेरीज रुका, तिरुका, सापिका, ससगणी, ही नाणी त्या काळात चलनात होती. सोन्याचा मुलामा असलेल्या होन नाण्याचीही छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्मिती केली होती. हे नाणे राजधानी रायगडावरील खास टांकसाळीत घडविले जायचे. एका होनची किंमत साडेतीन ते चार रुपये होती. एका पुतळीची किंमत पाच रुपये तर एक मोहोर पंधरा रुपये किंमतीची होती असा उल्लेख इतिहासात आढळून येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवकालीन शस्त्रांचीही त्यांनी प्रात्यक्षिकासह माहिती सांगितली.
युगंधर शस्त्र संग्रहाचे राजेंद्र अनवते शिवकालीन शस्त्राविषयी माहिती देताना.....
शिवकालीन नाणी केव्हाच कालबाह्य झाली असली तरी इतिहासप्रेमीकडून आजही त्यांना मोठी मागणी आहे. आपल्या संग्रहात या नाण्यांचा समावेश व्हावा म्हणून इतिहासप्रेमी वाटेल ती किंमत मोजतात.
प्रदर्शनाच्या माध्यमातून हा ठेवा लोकांपुढे मांडून राजेंद्र अनवते मराठी मनात ऐतिहासिक पाऊलखुणा रुजवित आहेत. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील राजेंद्र हरिदास अनवते यांच्या संग्रहात देखील शिवराई नाण्यांसह शिवकालीन शस्त्रांचा खजिना पाहयला मिळाला. हे दुर्मिळ प्रदर्शन पाहून नागरिक भारावून गेले होते. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शारदा नवरात्र उत्सवाचे कौतुक होत आहे.
0 Comments