मुरूम/प्रतिनिधी
शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणारा बेन्नीतुरा मध्यम प्रकल्प भरून ओव्हरफ्लो झाल्याने शहरातील शेतकऱ्यांच्या वतीने उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते रविवारी (ता. ६) रोजी प्रकल्प स्थळावर भजनाच्या गजरात जल पूजन करण्यात आले. शहर व परिसरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये व या परिसरातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी गेल्या ३० वर्षांपूर्वी शहराजवळून वाहणाऱ्या बेन्नीतुरा नदीवर बेन्नीतुरा मध्यम प्रकल्प उभारण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे या भागात बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागच्या वर्षी दुर्दैवाने पाऊस कमी झाल्याने प्रकल्पात पाणीसाठा कमी झाला होता. परिणामी या भागातील बागायत क्षेत्र कमी झाला आहे. यंदा मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने हा प्रकल्प भरून ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे या भागातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. हा बेन्नीतुरा प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला की जल पूजनाचा कार्यक्रम घेण्यात येतो. यावेळी बोलताना आमदार चौगुले म्हणाले की, मागच्या वर्षी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत धरणातील गाळ उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात गाळ उपसा केल्याने परिणामी धरण पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. याचा फायदा आगामी काळात होणार आहे. धरणाचा सांडवा लिकीज असल्याने पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
शासन दरबारी पाठपुरावा करून तात्काळ सांडवा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासोबत बांधावर जाऊन पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे तात्काळ सादर करण्याचे आदेशित केले आहे, असे सांगून या बाबत आगामी काळात विधानसभेत प्रश्न मांडून शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे, लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, भीमराव वरनाळे, शहरप्रमुख सुरेश मंगरुळे, प्रशांत मुदकण्णा, अमृत वरनाळे, प्रसाद मुदकण्णा, शहर शिवसेना युवा प्रमुख भगत माळी, शंकर टेकाळे, शाहूराज शिंदे, बाळासाहेब खंडागळे, मल्लिनाथ धुमुरे, साहेबलाल कुरेशी, व्यंकट चौधरी यांच्यासह असंख्य शेतकरी महसूल, पाटबंधारे, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुरूम, ता. उमरगा येथील बेन्नीतुरा मध्यम प्रकल्प भरून ओव्हरफ्लो झाल्याने शहरातील शेतकऱ्यांच्या वतीने उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते जलपूजन करताना बळीमामा सुरवसे, जगन्नाथ पाटील, भीमराव वरनाळे, सुरेश मंगरुळे, प्रशांत मुदकण्णा, अमृत वरनाळे, राजेंद्र कारभारी व अन्य.
0 Comments