धाराशिव: शासकीय कामात अडथळा निर्माण करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व लोखंडी सळईने मारहाण केल्याची खळबळजनक घटना धाराशिव शहरातील साठे चौक भागात घडली आहे. याप्रकरणी धाराशिव सिटी पोलीस ठाण्यात महिवुब चाँद शेख व त्याच्या इतर 4 ते 5 साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणचे विद्युत सहाय्यक दिनेश शिवाजी कदम (वय 37) हे त्यांचे सहकारी दत्तात्रय शितोळे, सोमनाथ कांबळे आणि जिवराज करडकर यांच्यासह शनिवारी (31 जानेवारी) सकाळी 10:30 च्या सुमारास साठे चौक परिसरात थकीत वीज बिल वसुलीसाठी गेले होते. यावेळी साठे चौकातील एका ग्राहकाचे वीज बिल थकीत असल्याने कर्मचाऱ्यांनी त्याबाबत चर्चा करून वीज प्रवाह खंडित करण्याची प्रक्रिया सुरू केली.
लोखंडी सळईने हल्ला आणि जीवे मारण्याची धमकी
वीज मीटरचे वायर काढत असताना तेथे उपस्थित असलेला महिवुब चाँद शेख याने आरडाओरडा करत बेकायदेशीर मंडळी जमवली. "तुम्ही लाईट कनेक्शन तोडून दाखवाच मग तुम्हाला दाखवतो" अशी धमकी देत त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला.आरोपीने तेथे पडलेली एक लोखंडी सळई उचलून दिनेश कदम यांच्या उजव्या हातावर मारून त्यांना जखमी केले. तसेच त्यांचे सहकारी दत्तात्रय शितोळे यांनाही मारहाण करून सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांत गुन्हा दाखल
या हल्ल्यानंतर दिनेश कदम यांनी धाराशिव सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी महिवुब चाँद शेख व इतर 5 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 121(1) , 189(2), 190,132 , 351(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश उत्तमराव जाधव करत आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
0 Comments