'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
धाराशिव/सोलापूर
"गेल्या काही महिन्यांपासून देशात आणि राज्यात सत्ताधारी पक्षाकडून प्रादेशिक पक्ष संपवण्याचे पद्धतशीर कारस्थान सुरू आहे. लोकप्रतिनिधींचा घोडेबाजार करून मतदारांचा घोर अपमान केला जात असून, लोकशाही वाचवण्यासाठी आता लोकप्रतिनिधींच्या अनिर्बंध अधिकारांवर कायद्याने कडक निर्बंध आणण्याची वेळ आली आहे, अन्यथा देशातील लोकशाहीचा अंत होईल," असा तीव्र इशारा विधी सेवा फाउंडेशन व प्रबोधन सेनेचे अध्यक्ष ॲड. सुरेश (बापू) गायकवाड यांनी दिला आहे. सोलापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी देशातील सद्य राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका केली.
केंद्रीय सत्ताधाऱ्यांकडून प्रादेशिक पक्ष संपवण्याचा घाट
ॲड. गायकवाड पुढे म्हणाले की, "देशातील सत्ताधारी पक्ष (भाजप) केंद्रीय यंत्रणा आणि पैशांच्या जोरावर इतर पक्षांना खिळखिळे करत आहे. आम आदमी पार्टी (AAP) असो की पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस (TMC), यांचे आमदार-खासदार फोडण्याचे राजकारण उघडपणे सुरू आहे. महाराष्ट्रातही हाच पॅटर्न राबवला गेला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तिकिटावर आणि निष्ठेवर निवडून आलेल्या ९ पैकी ६ खासदारांना फोडून सत्ताधाऱ्यांनी आपल्या सोयीच्या पक्षात सामील करून घेतले. आतापर्यंत देशातील जवळपास ३० ते ३२ खासदार सत्ताधारी पक्षाने वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी पाडून स्वतःकडे वळवले आहेत."
मतदारांशी प्रतारणा आणि न्यायव्यवस्थेची भूमिका
निवडणुकीच्या वेळी हेच लोकप्रतिनिधी प्रतिज्ञापत्रात पक्षाची ध्येयधोरणे राबवण्याची आणि जनतेची निष्पक्ष सेवा करण्याची शपथ घेतात. पक्षाची ताकद आणि मतदारांचा विश्वास वापरून ते विजयी होतात. मात्र, निवडून आल्यानंतर कोट्यवधी रुपयांच्या स्वाशामुळे हे लोकप्रतिनिधी मतदारांशी प्रतारणा करून पक्षांतर करतात.
"सध्याचा पक्षांतर बंदी कायदा आणि संविधानातील तरतुदी या गद्दारीला रोखण्यात तकलादू ठरत आहेत. दुर्दैवाने, सर्वोच्च न्यायालय देखील अशा संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांवर वेळेत निर्णय न घेता सोयीची भूमिका घेत आहे. यामुळे अशा अपकृत्यांना एकप्रकारे बळ मिळत आहे," असा थेट आरोपही ॲड. गायकवाड यांनी केला.
'मतदार राजा' केवळ बाहुले!
या संपूर्ण गलिच्छ राजकारणामुळे आज "मतदार राजा" राहिला नसून, तो केवळ लोकप्रतिनिधींना सत्तेच्या आणि पैशांच्या शिखरावर पोहोचवणारे एक 'बाहुले' बनला आहे. लोकशाहीसाठी ही अत्यंत घातक घंटा आहे.
तरुणांना आणि जनतेला आंदोलनाचे आवाहन
आता जनतेला गृहीत धरणाऱ्या या भ्रष्ट लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्यासाठी केवळ कायदे बदलून चालणार नाही, तर जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल. लोकप्रतिनिधींना पायबंद घालण्यासाठी कायद्यात कठोर सुधारणा करणे ही काळाची गरज आहे. या गंभीर विषयावर जनजागृती करण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण लवकरच व्यापक 'जनहित प्रबोधन मोहीम' राबवणार असल्याचे ॲड. सुरेश (बापू) गायकवाड यांनी शेवटी स्पष्ट केले.
0 Comments