'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी व परिसरातील घरकुल लाभार्थ्यांचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील अनुदान वेळेत न मिळाल्यामुळे अनेक घरे अर्धवट अवस्थेत आहेत. पावसाळा तोंडावर असल्याने गरिबांचे संसार उघड्यावर येण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. दत्तात्रय भास्कर शिंदे यांनी आज गटविकास अधिकारी (बीडीओ) हेमंत भिंगारदेवे यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाला धारेवर धरले. तसेच येत्या आठ दिवसांत हा निधी जमा न झाल्यास ७ जुलै २०२६ रोजी लाभार्थ्यांसह पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
तामलवाडी व तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत घरकुल मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून किंवा पदरचे पैसे लावून घरांची कामे सुरू केली आहेत. मात्र, प्रशासकीय उदासीनतेमुळे लाभार्थ्यांना हप्त्यांची रक्कम वेळेत मिळेनाशी झाली आहे. अनेकांचे दुसरा व तिसरा हप्ता रखडल्याने घरांची कामे खांबांवर किंवा छताविना अर्धवट आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, रोजगार हमी योजनेतून (रोहयो) मिळणारे हक्काचे पैसे अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले नसताना, ऑनलाइन यंत्रणेवर मात्र ते जमा झाल्याचे दाखवत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पावसाळा सुरू होत असल्याने लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
माजी उपसभापती दत्तात्रय शिंदे यांनी आज लाभार्थ्यांच्या व्यथा मांडणारे निवेदन तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांना प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केले. यावेळी सचिन शिंदे, नागेश शिंदे उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी धाराशिव, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. धाराशिव, आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनाही माहिती व उचित कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
निवेदन स्वीकारल्यानंतर गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, घरकुल लाभार्थ्यांच्या हप्त्यांचा प्रश्न अत्यंत तातडीने आणि प्राधान्यक्रमाने मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच रखडलेला निधी लवकरच थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी माजी उपसभापती दत्तात्रय शिंदे आणि उपस्थित लाभार्थ्यांना दिले.
अधिकारी काय म्हणाले?
"तामलवाडी व तुळजापूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानाचा प्रश्न आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तांत्रिक अडचणींमुळे किंवा निधी वितरणातील विलंबाने जे हप्ते रखडले आहेत, त्यांचा सविस्तर आढावा तात्काळ घेतला जात आहे. हा प्रश्न आम्ही प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर सोडवत असून, घरकुल लाभार्थ्यांचे हक्काचे पैसे अत्यंत लवकरच थेट त्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जातील. कोणत्याही पात्र लाभार्थ्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल."
— हेमंत भिंगारदेवे (गटविकास अधिकारी (बीडीओ), पंचायत समिती, तुळजापूर)
0 Comments