Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

जळकोटवाडीत महावितरणचा 'अंधार'; ट्रान्सफॉर्मरच्या प्रतीक्षेत बागायतदारांचा जीव टांगणीला!​द्राक्ष बागा सुकू लागल्या; तीन महिन्यांपासून नादुरुस्त डीपीचा ढिसाळ कारभार

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
​काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी शिवारात महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा 'संकटाचे ढग' जमा झाले आहेत. गावातील कलाल पाटील नावाने ओळखला जाणारा वीज रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याने, पन्नासहून अधिक शेतकरी आणि त्यांच्या हातापायाशी आलेल्या द्राक्ष बागा संकटात सापडल्या आहेत. एकीकडे सरकारने शेती पंपांचे वीज बिल माफ केले असताना, दुसरीकडे सुविधा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना असा 'अघोषित त्रास' सोसावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
​ऑईल गळतीचा 'नादुरुस्त' खेळ
जळकोटवाडी येथील संबंधित ट्रान्सफॉर्मरवर पन्नास शेती पंपांची जोडणी आहे. मागील तीन महिन्यांपूर्वी हा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला होता. त्यानंतर महावितरणने तो बदलून दिला खरा, परंतु तोही तांत्रिकदृष्ट्या सदोष आणि ऑईल गळती होणारा असल्याने काही दिवसांतच बंद पडला. हा बदलून दिलेला ट्रान्सफॉर्मर म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

​खर्च करूनही सुविधा मिळेना!
या भागातील शेतकरी आपल्या बागा वाचवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहेत. याबाबत व्यथा मांडताना एका प्रगतशील शेतकऱ्याने सांगितले की, "सरकारने शेतीपंपाचे वीज बिल माफ केले असले, तरी प्रत्यक्ष सुविधेच्या बाबतीत परिस्थिती गंभीर आहे. आम्हाला ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च, मजुरी व अन्य तांत्रिक खर्च आम्ही स्वतःच्या खिशातून भरण्यास तयार आहोत आणि वारंवार मागणीही करत आहोत, तरीही महावितरणकडून आम्हाला सुस्थितीत असलेला ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. आम्ही पैसे भरूनही सुविधांपासून वंचित राहणे हे दुर्दैवी आहे."
​दुष्काळात तेरावा महिना
सध्या तालुक्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच द्राक्ष बागांना विहिरीतील पाणी देणे हाच एकमेव पर्याय उरला आहे. मात्र, वीज पुरवठा नसल्याने विहिरीचे पाणी पिकांपर्यंत पोहोचवणे अशक्य झाले आहे. यामुळे बागा वाळून जाण्याची भीती असून, लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याच्या मार्गावर आहे.
​मागणी तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
"आम्ही नियमित पाठपुरावा करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून केवळ 'उद्या-परवा' अशी आश्वासने मिळत आहेत. जर तातडीने सुस्थितीतला ट्रान्सफॉर्मर बसवून वीज पुरवठा सुरळीत केला नाही, तर बागायतदारांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, याची नोंद प्रशासनाने घ्यावी."
— त्रिंबक (भाऊ) फंड 
प्रगतिशील द्राक्ष बागायतदार, जळकोटवाडी.

Post a Comment

0 Comments