'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नामांकित 'सरस्वती विद्यालयात' इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व आणि दिमाखदार प्रवेशोत्सव सोहळा नुकताच पार पडला. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि आकर्षक मिरवणुकीने या सोहळ्याला एक वेगळीच रंगत आणली होती. चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या सुमारे १७५ विद्यार्थ्यांचे गावातून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.
विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे आगमन होताच, जुन्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि पुष्पवृष्टी करत त्यांचे उत्साहात स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष बसवनाप्पा मसुते, ज्येष्ठ संचालक मल्लिकार्जुन मसुते, अब्बास पटेल, गोरख माळी, बाळासाहेब जगताप, जितेंद्र माळी आणि प्राचार्य सुहास वडणे सर आदी मान्यवरांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
ज्ञानाचे मंदिर आणि यशाची परंपरा!
"नवीन विद्यार्थ्यांचे विद्यालयात स्वागत करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. आमच्या प्रशालेने नेहमीच गुणवत्तेची परंपरा जपली असून, नवीन पिढीनेही हाच वारसा पुढे चालवावा," असे प्रतिपादन प्राचार्य सुहास वडणे यांनी स्वागतपर भाषणात केले.
माजी विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशाचा सन्मान
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे यश.
श्रद्धा सावंतचा गौरव: विद्यालयाची माजी विद्यार्थिनी श्रद्धा शिवाजी सावंत हिने बारावी सीईटी (CET) परीक्षेत ९७.७% गुण मिळवून सोलापूरच्या नामांकित वालचंद कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल शाल, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन तिचे विशेष कौतुक करण्यात आले.
खाकीची शान: गंजेवाडी सारख्या ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबई पोलीस दलात भरती झालेली विद्यालयाची माजी विद्यार्थिनी पुनम लोकरे हिचाही या प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गुणवंतांची शाबासकी
प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये
इयत्ता दहावी: श्रेयश पाटील (प्रथम), श्लोक सिद्धगणेश (द्वितीय), नयन जाधव (तृतीय).
इयत्ता बारावी: सायली चौगुले (प्रथम), सानिका जाधव (द्वितीय), वैष्णवी काळे (तृतीय).
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष बसवन्नाप्पा मसुते यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राऊत सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बटलवाड सर यांनी मानले. या सोहळ्याला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments