सांगवी (काटी) येथील शासकीय रोपवाटिकेत आयोजित निरोप समारंभात सैन्यदल आणि वनविभागातील प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेले वनरक्षक काशीनाथ शेवाळे यांचा सत्कार करताना वनविभागाचे कर्मचारी, वनमजूर व ग्रामस्थ.
'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
मातृभूमीच्या संरक्षणासाठी सैन्यात २४ वर्षे कठोर कर्तव्य बजावल्यानंतर, वनसंपदेच्या रक्षणासाठी वनविभागात सलग १३ वर्षे अहोरात्र सेवा देणारे तामलवाडी बीट १ चे वनरक्षक काशीनाथ शेवाळे ३१ ऑगस्ट रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या प्रदीर्घ, खडतर आणि समर्पित सेवाप्रवास बद्दल सांगवी (काटी) येथील शासकीय रोपवाटिकेत वनमजूर आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा भावूक वातावरणात नागरी सत्कार करून सस्नेह निरोप देण्यात आला.
देशसेवेचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेले काशीनाथ शेवाळे यांनी सैन्यदलातील निवृत्तीनंतर वनविभागात रुजू होऊन निसर्ग आणि वनसंपदेच्या रक्षणाचा वसा शेवटच्या दिवसापर्यंत तितक्याच निष्ठेने सांभाळला. तामलवाडी बीट कार्यक्षेत्रातील वृक्षसंवर्धन, अतिक्रमण नियंत्रण, रोपवाटिका विकास आणि वन्यजीवांचे रक्षण यामध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या शांत, संयमी आणि कर्तव्यदक्ष स्वभावामुळे त्यांनी अधिकारी, सहकारी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला होता.
सांगवी रोपवाटिकेच्या प्रांगणात पार पडलेल्या या निरोप समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेवाळे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला. यावेळी वनमजुरांनी आपल्या भावना व्यक्त करताना, शेवाळे यांनी नेहमीच सहकाऱ्यासारखे मार्गदर्शन केले आणि प्रत्येक कामात पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, अशी कृतज्ञता व्यक्त केली.
या निरोप समारंभास वनविभागाचे वनरक्षक एस. डी. तांदळे, राठोड, सुनील पाटील, कल्याण सरडे, मारुती मगर, साधू शिंदे, मारुती बेटकर, विकास गायकवाड, विष्णू माळी, महादेव कोडगिरे, बापू पवार, अशोक चव्हाण, तुकाराम वाडकर यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी, स्थानिक वनमजूर आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शेवाळे यांना भावी निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
0 Comments