Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

समतेचा हुंकार अन्‌ लोकशाहीरांच्या विचारांचा जागर: काटीत अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात; १० लाखांच्या सभामंडपाने वचनाची पूर्तता

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
श्रमिक, वंचित आणि शोषितांच्या वेदनांना आपल्या धारदार लेखणीतून साहित्याची ताकद देणारे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती तुळजापूर तालुक्यातील काटी येथे अत्यंत उत्साहात, भक्तिभावपूर्ण आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या सोहळ्याचे औचित्य साधून अण्णा भाऊ साठे नगरातील समाजबांधवांना दिलेला शब्द पाळत १० लाख रुपयांच्या सभामंडपाचे मंजुरी पत्र सुपूर्द करण्यात आल्याने यावर्षीच्या जयंतीोत्सवाला सामाजिक बांधीलकी आणि विकासाची मोठी जोड मिळाली.

भव्य मिरवणूक अन्‌ सांस्कृतिक उपक्रम
जयंतीनिमित्त काटी गावातून अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य आणि दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. निळ्या-गुलाबी रंगाची उधळण, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि 'अमर रहे, अमर रहे, अण्णा भाऊ साठे अमर रहे' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तरुणांचा उत्साह, महिलांची लक्षणीय उपस्थिती आणि शाहिरी पोवाड्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण काटी गावात पुरोगामी आणि समतेच्या विचारांचा जागर पाहायला मिळाला. मिरवणुकीपूर्वी लोकशाहीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

'शब्दाला जागले नेतृत्व': सभामंडपासाठी १० लाखांचा निधी हस्तगत
साठेनगर येथील समाजबांधवांची अनेक दिवसांपासून एका हक्काच्या सभामंडपाची मागणी होती. तुळजापूर पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह (मालक) देशमुख यांनी गेल्या वर्षीच्या जयंतीप्रसंगी दिलेला शब्द पाळत भाजप तालुकाध्यक्ष महादेव जाधव यांच्या पाठपुराव्याने हा प्रश्न मार्गी लावला. तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आमदार निधीतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्याचे अधिकृत पत्र जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भाले यांच्या हस्ते आणि गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत समाजबांधवांकडे सुपूर्द करण्यात आले.

गावाच्या विकासाला मिळणार नवी दिशा
या सभामंडपामुळे साठेनगरातील नागरिकांना सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. शोषित-वंचितांच्या सलोख्यासाठी आणि गावच्या सर्वांगीण विकासासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

लेखणीतून अन्यायाविरुद्ध बुलंद केला आवाज
अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि साहित्यातून केवळ मनोरंजन केले नाही, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवून समाज परिवर्तनाची मशाल पेटवली. त्यांनी रुजवलेली समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाची मूल्ये आजच्या पिढीलाही समाजहितासाठी कार्य करण्याची निरंतर प्रेरणा देतात, असे प्रतिपादन उपस्थितांनी आपल्या मनोगतातून केले.

यावेळी उपस्थित ग्रा. सदस्य अनिल गुंड, संपत पंके, मकरंद देशमुख, रामहरी थोरबोले,करीम बेग, चंद्रकांत काटे, संजय महापुरे,अविनाश देशमुख, सोसायटी चेअरमन संजय साळुंखे नजीब काझी, मंजूर कुरेशी भोलेनाथ बनोसोडे, त्रिगुणशील साळुंके, दशरथ बनसोडे, अमर देशमुख, प्रशांत चव्हाण, राजू हांडे, तसेच एस.एम. ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments