'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
दीड महिन्यांच्या प्रदीर्घ सुटीनंतर अखेर शाळांची घंटा वाजली असून, विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळांचा परिसर गजबजला आहे. विद्यार्थ्यांची शाळेविषयीची ओढ व आस्था कायम राहावी, तसेच नव्याने दाखल होणाऱ्या पहिलीच्या चिमुरड्यांना शाळेची गोडी लागावी, यासाठी शासन स्तरावरील मार्गदर्शक सूचनांनुसार तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी येथे 'शाळा प्रवेशोत्सव' विविध उपक्रमांनी आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही याची घेतली दक्षता
या प्रवेशोत्सवाची पूर्वतयारी म्हणून दि. १३ जून रोजी शाळेतील शिक्षकांनी शालेय परिसरातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश निश्चित केले. परिसरात एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, याची चोख दक्षता घेण्यात आली. तसेच, शाळापूर्व तयारी मेळाव्यासाठी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवागतांच्या पालकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांचे समुपदेशनही करण्यात आले.
आनंदी वातावरणात निघाली 'प्रवेश दिंडी'
दि. १५ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांसमवेत गावातून उत्साही वातावरणात 'प्रवेश दिंडी' काढण्यात आली. शाळा स्तरावर आयोजित मुख्य कार्यक्रमात नव्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. याचवेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचे आणि प्रातिनिधिक स्वरूपात गणवेशांचे वाटप करण्यात आले. नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध आणि गणवेश मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी
स्वागत समारंभानंतर 'शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक २' चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता पहिलीतील चिमुरड्यांचा शारीरिक, भाषिक, सामाजिक, भावात्मक आणि बौद्धिक विकास तपासण्यासाठी विविध रंजक व नाविन्यपूर्ण उपक्रम आणि खेळ घेण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रामकृष्ण चव्हाण, सरपंच श्री. पांडुरंग चव्हाण, पंचायत समिती सदस्या श्रीम. भाग्यश्री शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष माधुरी प्रदीप चव्हाण, सदस्य राहुल चव्हाण, भरत चव्हाण तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या श्रीम. नैना खलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. नितीन गायकवाड, सहशिक्षक श्री. हणमंत डोलारे, विकास ढंगे, शांताराम कुंभार, श्रीमती सुवर्णा काळे आणि श्रीमती दिपाली व्होटे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील पालकांनी या उपक्रमाचे मोठे कौतुक केले आहे.
0 Comments