Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कदमवाडीत 'प्रवेशोत्सव' उत्साहात; नवागतांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत!मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश अन् खाऊचे वाटप; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी / उमाजी गायकवाड 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी (मा) येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी 'प्रवेशोत्सव मिरवणूक' अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडली. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि आकर्षक सजवलेल्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले.

शाळेच्या पहिल्या दिवशी गावातून नवागत विद्यार्थ्यांची भव्य दिंडी काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी प्रशांत मिसाळ यांनी आपला ट्रॅक्टर उपलब्ध करून देत मिरवणुकीची शोभा वाढवली. संपूर्ण गावातून फिरल्यानंतर मिरवणूक शाळेत आली, जिथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

मोफत साहित्यांचे वाटप
शासकीय योजनेअंतर्गत पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. ज्ञानेश्वर कदम यांच्यातर्फे नवागतांसह शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर ग्रामपंचायत सदस्य श्री. दत्ता साळुंखे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्याचे जाहीर केले.

खाऊची रेलचेल
शाळेचा पहिला दिवस मुलांसाठी गोड आणि संस्मरणीय ठरला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भैरवनाथ गिरी यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करण्यात आली. तर आकाश कदम यांनी कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांना थंडगार कुल्फी वाटप करून बालचमूंना सुखद धक्का दिला.

ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य
या संपूर्ण उपक्रमाला कदमवाडीतील पालकांचे आणि ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले. पहिल्याच दिवशी शाळेत दाखवलेल्या या उत्साहामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी अधिक निर्माण होईल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

या सोहळ्याला नवागतांचे पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, अंगणवाडी ताई, ग्रामपंचायत सदस्य आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments