Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा! तुळजापुरात कृष्णा रोचकरी यांच्या नेतृत्वात मराठवाड्यात तातडीने 'कोरडा दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी!

Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
मराठवाडा विभागासह विशेषतः धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसाचे अत्यंत अल्प व अनियमित प्रमाण राहिल्याने भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात तातडीने 'कोरडा दुष्काळ' जाहीर करून दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य कृष्णा भैय्या रोचकरी यांच्या नेतृत्वात तुळजापूर तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात कृष्णा भैय्या रोचकरी यांनी स्पष्ट केले की, पेरणीनंतर पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरीप पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. पिके करपून गेल्याने उत्पादनात प्रचंड घट होण्याची आणि हाताशी आलेली पिके वाया जाण्याची दाट शक्यता आहे. पिकांच्या हानीसोबतच जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालला आहे. विहिरी, तलाव व बंधाऱ्यांमधील पाणीसाठा झपाट्याने घटल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईचे तीव्र सावट पसरले आहे.

ही परिस्थिती केवळ शेतकऱ्यांच्या नुकसानीपुरती मर्यादित नसून त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे सांगत कृष्णा भैय्या रोचकरी यांनी शासनाने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची वाट न पाहता तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

कृष्णा भैय्या रोचकरी यांच्या प्रमुख मागण्या:
वस्तुनिष्ठ आढावा व तातडीचे पंचनामे: खरीप पिके, फळबागा आणि ऊस पिकांचे त्वरित वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानीचा आढावा घेण्यात यावा.

पीकविमा व सवलती: पीकविमा कंपन्यांना शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत.

टँकर व शैक्षणिक शुल्क माफी: टंचाईग्रस्त भागात तात्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात.

मराठवाड्यातील व जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीचा विचार करून शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही या प्रसंगी देण्यात आला.

Post a Comment

0 Comments