'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
व्हिएतनाममधील दा नांग येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’ (UWW) आणि व्हिएतनाम रेसलिंग फेडरेशन आयोजित ‘आशियाई अॅमॅच्युअर एमएमए (AMMA) आणि पॅनक्रेशन अजिंक्यपद’ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपल्या आक्रमक खेळाने साऱ्या आशियाचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील प्रतिभावान कन्या समीक्षा जयदेव म्हमाणे हिने -५० किलो वजनी गटात अत्यंत चुरशीच्या लढतीत रौप्यपदक पटकावून देशाची आणि राज्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
दा नांग येथे १५, १७, २० वर्षांखालील आणि वरिष्ठ अशा विविध गटांत ही स्पर्धा पार पडली. यात आशिया खंडातील सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग होता. भारतीय संघाने AMMA आणि पॅनक्रेशन प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत एकूण १९ पदकांवर आपले नाव कोरले. यात भारतीय पुरुष संघाने ९ तर महिला संघाने ६ पदके जिंकत भारताच्या वाढत्या क्रीडा सामर्थ्याचा ठसा उमटवला आहे.
वडिलांचा वारसा आणि समीक्षाची जिद्द
समीक्षा जयदेव म्हमाणे ही या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात तरुण आणि आश्वासक खेळाडू ठरली. तिच्या या यशात तिची कठोर मेहनत आणि जिद्दीचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पंच म्हणून समीक्षाचे वडील जयदेव म्हमाणे यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. अधिकृत पंचांच्या भूमिकेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव पंच होते, हे विशेष. वडील एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत असताना, दुसरीकडे लेकीने रौप्यपदक पटकावून म्हमाणे कुटुंबाचा क्रीडा वारसा अधिकच तेजस्वी केला आहे.
क्रीडावर्तुळातून कौतुकाचा वर्षाव
समीक्षाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. "समीक्षाची चिकाटी, तिचे क्रीडाप्रेम आणि देशासाठी लढण्याची तिची भावना आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. भारताची ही क्रीडा घोडदौड अशीच कायम राहो," अशा शब्दांत तिचे कौतुक केले जात आहे. समीक्षाच्या या यशाने केवळ वडगाव (काटी) च नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
0 Comments