नांदेड-सावंतवाडी विशेष एक्स्प्रेसच्या पहिल्या फेरीदरम्यान लातूर स्थानकावर लोको पायलट मनोहर गोसावी व असिस्टंट लोको पायलट सागर लोंढे यांचा सत्कार करताना समीर पडवळ, सोमेश्वर रत्नपारखी, अभिषेक सूर्यवंशी व इतर रेल्वेप्रेमी.
लातूर/धाराशिव | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
मराठवाडा आणि कोकण या दोन महत्त्वाच्या भागांना थेट जोडणारा एक नवा ऐतिहासिक अध्याय आज रचला गेला आहे. आजवरच्या रेल्वे इतिहासात पहिल्यांदाच नांदेड ते सावंतवाडी या विशेष एक्स्प्रेसची पहिली फेरी अतिशय उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात सुरू झाली. या नव्या रेल्वे सेवेमुळे मराठवाडा आणि कोकणातील प्रवाशांचे थेट कनेक्टिव्हिटीचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर साकार झाले आहे.
पहाटे ५ वाजता लातूरमध्ये आगमन
आज पहाटे ५:०० वाजता ही विशेष ट्रेन लातूर रेल्वे स्थानकावर दाखल झाली. लातूर स्थानकावर अवघ्या १५ मिनिटांच्या (पहाटे ५:१५ वाजता प्रस्थान) थांब्यादरम्यान या ऐतिहासिक गाडीचे आणि तिचे सारथ्य करणाऱ्या लोको वैमानिकांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले.
लोको पायलटचा विशेष सत्कार
या पहिल्या ऐतिहासिक फेरीचे सारथ्य करणारे लोको पायलट मनोहर गोसावी आणि असिस्टंट लोको पायलट सागर लोंढे यांचा लातूर स्थानकावर पुष्पगुच्छ व शाल देऊन विशेष गौरव करण्यात आला. हा सत्कार दक्षिण मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे सचिव श्री. समीर गणपती पडवळ, प्रसिद्ध युट्यूबर सोमेश्वर रत्नपारखी तसेच रेल्वे प्रेमी व इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर श्री. अभिषेक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
दक्षिण मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीकडून मनःपूर्वक स्वागत
मराठवाड्यातून कोकणासाठी थेट रेल्वे धावणे हा संपूर्ण परिसरासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. दक्षिण मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने या विशेष रेल्वेचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
"मराठवाडा आणि कोकणाला जोडणारा हा मार्ग व्यापार, पर्यटन आणि सामाजिक संबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरेल. या विशेष रेल्वेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल आणि भावी पिढीसाठी ही रेल्वे सेवा अधिक भक्कम व नियमित होईल," असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
जय रेल्वे! जय मराठवाडा!
0 Comments