Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिक्षकांनी 'एआय' अन् डिजिटल तंत्रज्ञानाने अपडेट राहणे काळाची गरज! 'चला शाळेला जाऊया' उपक्रमांतर्गत शिक्षण सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांची सरस्वती विद्यालय, तामलवाडीला भेट; विविध समित्यांचा घेतला आढावा

"तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयात शिक्षण सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांचे स्वागत करताना संस्थाध्यक्ष बसवनाप्पा मसुते, प्राचार्य सुहास वडणे व इतर."

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या 'चला शाळेला जाऊया' या विशेष उपक्रमांतर्गत शिक्षण विभाग (पुणे) येथील शिक्षण सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयाला सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान डॉ. आवटे यांनी शाळेतील विविध शैक्षणिक, प्रशासकीय आणि सामाजिक उपक्रमांची सखोल माहिती घेतली. तसेच शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत स्वतःला अद्ययावत ठेवण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. बीराप्पा शिंदे, गटशिक्षणाधिकारी श्रेयश काळे, विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे, विस्तार अधिकारी राऊत मॅडम, सुरतगावचे केंद्रप्रमुख डॉ. शिवाजी चव्हाण, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे साधन व्यक्ती उबाळे सर, अंकुशे सर, शिंदे सर आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

भेटीदरम्यान शिक्षण सहसंचालक डॉ. आवटे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने शालेय पोषण आहार, ग्रंथालय विभाग, 'सखी सावित्री मंच', परिवहन विभाग, शाळा व्यवस्थापन समिती (SMC), विद्यार्थी सुरक्षितता समिती, विद्यार्थी तक्रार निवारण समिती, शिक्षक-पालक सभा, 'इको क्लब', निपुण चाचणी आणि विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती अशा विविध महत्त्वाच्या विभागांचे कामकाज व नोंदींची पाहणी केली.

डिजिटल शिक्षण आणि ॲप्सचा वापराचे आवाहन
शिक्षकांना मार्गदर्शन करताना डॉ. आवटे म्हणाल्या, "बदलत्या काळात शिक्षकांनी अद्ययावत ज्ञानाने समृद्ध राहणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (A.I.) चे प्रशिक्षण घेऊन डिजिटल अध्यापनावर भर दिला पाहिजे. 'दीक्षा ॲप', 'जयंत नारळीकर शैक्षणिक ॲप' आणि 'करिअर ॲप' यांसारख्या अद्ययावत शैक्षणिक ॲप्सचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण द्यावे."

प्रारंभी, विद्यालयाचे प्राचार्य सुहास वडणे, पर्यवेक्षक महादेव मसुते आणि संस्थेचे अध्यक्ष बसवनाप्पा मसुते यांनी मान्यवर अधिकाऱ्यांचे श्रीफळ, हार व पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत केले. प्रास्ताविक व मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य सुहास वडणे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडत शिक्षण संचालकांसह सर्व पथकाचे आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष बसवन्नाप्पा मसुते यांनी सद्यस्थितीत शिक्षक भरती प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणी व आव्हानांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राऊत सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार स्वामी सर यांनी मानले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments