Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

केमवाडीत उसावरील ‘पायरीला’ किडीच्या नियंत्रणासाठी ड्रोनद्वारे फवारणी; कृषी विभागाकडून बांधावर जाऊन मार्गदर्शन;क्लोरोपायरी फॉस व सायपरमेथ्रीन ५% ईसी ची फवारणी करण्याचा सल्ला

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे उसावर ‘शुगरकेन पायरीला’ (रसशोषक कीड) या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) काटी भागाचे प्रभारी कृषी मंडळ अधिकारी आनंद पाटील यांनी शेतांना भेट देऊन उपस्थितांना तातडीच्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले. या वेळी वाढलेल्या उसात प्रभावी नियंत्रणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा (Drone Spraying) वापर करून औषध फवारणी करण्यात आली.

केमवाडी येथील ऊस उत्पादक शेतकरी बालाजी काळे व परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या उसावर पायारीला या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. उसाची वाढ पूर्ण झालेली असल्याने पारंपरिक पंपाने फवारणी करणे कठीण बनले होते. यावर तोडगा म्हणून बालाजी काळे यांनी आधुनिक ड्रोनच्या साहाय्याने औषधाची फवारणी करून किडीवर मात करण्याचा प्रयत्न केला.

कृषी सहाय्यकांचे तातडीचे मार्गदर्शन
या भेटीदरम्यान प्रभारी कृषी मंडळ अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले की, "पायारीला किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन ५% ईसी (Cypermethrin 5% EC) या कीटकनाशकाची योग्य प्रमाणात फवारणी करावी."

या प्रसंगी सहाय्यक कृषी अधिकारी स्मिता घाडगे, सचिन काळे, मेघराज जतकर यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'Only न्युज धाराशिव' विशेष: पायारीला किडीचे एकात्मिक व्यवस्थापन
कृषी विभागाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी खालील सुरक्षात्मक व तांत्रिक उपायांचा अवलंब करावा:
कीड ओळख व नुकसान:
प्रौढ व पिल्ले दोन्ही पानांच्या खालच्या बाजूने रस शोषतात. त्यामुळे पाने फिकट पिवळी पडतात आणि त्यांनी सोडलेल्या चिकट द्रवावर (हनीड्यू) काळी बुरशी वाढते. यामुळे प्रकाशसंश्लेषण मंदावून उसातील साखरेचे प्रमाण व वजन घटते.
शेताची पाहणी व स्वच्छता:
उसातील जुनी व वाळलेली पाने (पाचट) काढून टाकावीत, जेणेकरून शेतात हवा खेळती राहील.

पानांच्या खालच्या बाजूला किडींची अंडी किंवा पिल्ले आढळल्यास ती पाने नष्ट करावीत.

जैविक व जैविक-बुरशीजन्य नियंत्रण:
निसर्गात आढळणाऱ्या 'एपिरिकॅनिया मेलॅनोलेउका' (Epiricania melanoleuca) या मित्र कीटकाचे संरक्षण करावे. मित्र कीटक शेतात पुरेशा प्रमाणात असल्यास रासायनिक फवारणी टाळावी.

'मेटारायझियम ॲनिसोप्ली' (Metarhizium anisopliae) या जैविक बुरशीची ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रासायनिक नियंत्रण (कृषी सल्ला):
किडीची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीवर गेल्यास, कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने सायपरमेथ्रीन ५% ईसी (१० मिली) किंवा क्लोरोपायरीफॉस २०% ईसी (२० मिली) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फवारणी करताना पानांची खालची बाजू पूर्णपणे भिजेल याची दक्षता घ्यावी.

कृषी अधिकारी यांचा सल्ला 
१) "केमवाडी परिसरात उसावर 'पायारीला' या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी उसातील जुनी, वाळलेली पाने काढून (पाचट काढून) शेतात हवा खेळती ठेवावी. तसेच, तातडीने ५० टक्के अधिक सायपरमेथ्रीन ५ टक्के ईसी (Cypermethrin 5% EC) या द्रावणाची योग्य प्रमाणात फवारणी करावी, जेणेकरून किडीचा प्रसार रोखता येईल."
— आनंद पाटील (प्रभारी मंडळ कृषी अधिकारी, काटी मंडळ)

२) "उसाची वाढ जास्त झाल्यामुळे पंपाने फवारणी करणे कठीण असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून औषध फवारणी करावी. किडीची सुरुवातीची लक्षणे दिसताच शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. योग्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड नियंत्रणाचा अवलंब केल्यास 'पायारीला' किडीवर पूर्णपणे मात करता येते."
— स्मिता घाडगे ( सहाय्यक कृषी अधिकारी, काटी मंडळ)

Post a Comment

0 Comments